संसदेच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान १३ डिसेंबर रोजी चार तरुणांनी संसदेच्या परिसरात घुसखोरी करून एकच खळबळ उडवून दिली होती. सागर शर्मा आणि डी. मनोरंजन हे दोन तरून लोकसभेच्या प्रेक्षक गॅलरीतून थेट सभागृहात उतरले होते. या तरुणांना भाजपा खासदार प्रताप सिंह यांनी प्रवेशपत्रिका दिली होती. त्यानंतर प्रताप सिंह यांच्यावर विरोधकांनी टीका केली. आता प्रताप सिंह यांनी आपली भूमिका मांडली असून ‘मी देशद्रोही आहे की देशभक्त’ याचा निर्णय माझ्या मतदारसंघातील जनता घेईल, असे विधान प्रताप सिंह यांनी केले आहे.

संसदेत घुसखोरी झाल्यानंतर कर्नाटकमध्ये काही संघटनांनी म्हैसूरचे खासदार प्रताप सिंह यांच्याविरोधात आंदोलन केले. तसेच काही संघटनांनी प्रताप सिंह यांच्या हातात बॉम्ब असलेला फोटो पत्रकावर छापून त्यांच्यावर देशद्रोही असे लिहिले होते. ठिकठिकाणी हे पत्रक चिटकवण्यात आल्यानंतर प्रताप सिंह यांनी यावर प्रतिक्रिया नोंदविली. “मी कोण आहे, हे माझ्या मतदारसंघातील लोकांना चांगले ठाऊक आहे आणि २०२४ च्या लोकसभा निवडणुकीतून ते दिसून येईल”, अशी प्रतिक्रिया खासदार प्रताप सिंह यांनी दिली.

हे वाचा >> Parliament Attack : “…म्हणून मी त्या तरुणांना प्रेक्षक गॅलरीचे व्हिजिटर पास दिले”, भाजपा खासदाराचं स्पष्टीकरण

प्रताप सिंह म्हणाले, “देवी चामुंडेश्वरी, माता कावेरी, मागच्या २० वर्षांपासून माझे सदर वाचणारे वाचक, म्हैसूर आणि कोडगू येथील लोक जे २० वर्षांपासून माझे काम पाहत आले आहेत, हे लोक मी देशद्रोही आहे की देशभक्त हे ठरवतील. याचा निर्णय २०२४ च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान होईल.”

काही दिवसांपूर्वी प्रताप सिंह यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेऊन दोन्ही घुसखोरांना पास का दिला? याचे स्पष्टीकरण दिले होते. डी. मनोरंजन याचे वडील माझ्या मतदारसंघात राहत असून त्यांनी मुलाला संसद पाहायची असल्याचे सांगून प्रवेशपत्रिका मागितली होती. माझ्या मतदारसंघातील असल्यामुळे मी त्यांना पास देऊ केला होता. तसेच याव्यतिरिक्त या तरुणांची कोणतीही माहिती आपल्याला नसल्याचेही प्रताप सिंह यांनी सांगितले.

आणखी वाचा >> Video : लोकसभेत घुसखोरी केलेल्या तरुणांना खासदारांनी दिला चोप; व्हिडिओ व्हायरल

लोकसभेत घुसलेल्या दोन तरूणांना प्रताप सिंह यांनी पास दिल्याची बातमी बाहेर आल्यानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांनी त्यांच्या म्हैसूरमधील घराबाहेर आंदोलन केले होते.