स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त प्रत्येकाच्या घरावर तसेच सोशल मीडियावर प्रोफाईल पिक्चर म्हणून तिरंगा लावण्याचे आवाहन केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून करण्यात आले आहे. मोदींच्या या आवाहनावर काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी टीका केली असून ज्यांच्या मातृसंस्थेने (राष्ट्रीय स्वयंसेवक संघ) स्वातंत्र्यानंतर ५२ वर्षापर्यंत त्यांच्या मुख्यालयावर तिरंगा फडकवला नाही, त्याच संघटनेतून पुढे आलेले लोक आता तिरंग्याबद्दल बोलत आहेत, अशी टीका केली होती. राहुल गांधी यांच्या याच टीकेला आता भाजपा खासदार प्रल्हाद जोशी यांनी प्रत्युत्तर दिले आहे. राहुल गांधी हे अर्धवेळ राजकारणी आहेत. त्यांच्या टिप्पणीला गांभीर्याने घेण्याची गरज नाही. संघाच्या विचारधारेला पूर्ण देशाने स्वीकारलेले आहे, असे प्रल्हाद जोशी म्हणाले आहेत.
हेही वाचा >>> ५० हजार पगार आणि दीड कोटींचं घर, छापा पडताच प्यायलं विष, घरात ८५ लाख रुपये सापडल्यानंतर अधिकारीही चक्रावले
“राहुल गांधी हे अर्धवेळ राजकारणी आहेत. राहुल गांधी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर केलेल्या टिप्पणीला गंभीरतेने घेण्याची गरज नाही. संघ तसेच संघाच्या विचारधारेला पूर्ण देशाने स्वीकारलेले आहे. देशाला स्वातंत्र्य मिळवून दिल्याचा पोकळ दावा करणाऱ्या काँग्रेसची स्थिती आज कशी आहे, हे सर्वांनाच माहिती आहे,” अशी टीका प्रल्हाद जोशी यांनी केली आहे.
हेही वाचा >>> मोठ्या घडामोडीची चाहूल? सर्व कार्यक्रम रद्द करुन फडणवीस दिल्लीला रवाना; शाह, नड्डा यांची भेट घेण्याची शक्यता
राहुल गांधी काय म्हणाले होते ?
“देशाचा तिरंगा फडकत राहावा म्हणून आतापर्यंत लाखो लोकांनी स्वत:चे बलिदान दिले. मात्र हाच तिरंगा स्वीकारण्यास एका संस्थेने कामय नकार दिला. या संघटनेने आपल्या मुख्यालयात स्वातंत्र्यानंतर ५२ वर्षांपर्यंत तिरंगा फडकवला नाही. ज्या संघटनेने तिरंग्याचा अपमान केला, त्या संघटनेतून आलेलेच आता तिरंग्याच्या इतिहासाबद्दल सांगत आहेत. हर घर तिरंगा मोहीम राबवत आहेत. आरएसएस संघटनेने ५२ वर्षापर्यंत तिरंगा का फडकवला नव्हता,” अशी टीका राहुल गांधी यांनी केली.
हेही वाचा >>> Uddhav Thackeray Vs Eknath Shinde SC: …काही गरज नव्हती, सुप्रीम कोर्टातील सुनावणीवर उज्वल निकम यांनी मांडलं स्पष्ट मत
दरम्यान, केंद्र सरकारकडून स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त देशभरात हर घर तिरंगा ही मोहीम राबवली जात आहे. या मोहिमेच्या माध्यमातून प्रत्येक घरावर तिरंगा फडकवण्याचे आवाहन केले जात आहे. तसेच सोशल मीडियावर प्रोफाईल पिक्चर म्हणून तिरंग्याचा फोटो अपलोड करावा, असेदेखील म्हटले जात आहे. पतंप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अन्य भाजपा नेत्यांनी समाजमाध्यमांवर प्रोफाईल फोटो म्हणून तिरंगा ठेवला आहे. तर राहुल गांधी यांनीदेखील हातात तिरंगा घेऊन उभे असलेल्या पंडित जवाहरलाल नेहरू यांचा फोटो डीपी म्हणून ठेवला आहे.