मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील पहिल्या अधिवेशनाला आजपासून सुरूवात झाली आहे. या अधिवेशनाआधी विरेंद्र कुमार यांनी लोकसभेचे हंगामी अध्यक्ष म्हणून शपथ घेतली. १७ व्या लोकसभेच्या पहिल्या अधिवेशनाला आजपासून सुरूवात झाली आहे. या अधिवेशनाच्या आधी राष्ट्रपतींची भेट घेऊन विरेंद्र कुमार यांनी हंगामी अध्यक्ष म्हणून शपथ घेतली. राष्ट्रपती भवनात हा शपथविधी पार पडला.

संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून सुरूवात झाली आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न, बेरोजगारी, दुष्काळ या महत्त्वाच्या प्रश्नांवर अर्थसंकल्पीय अधिवेशनात चर्चा केली जावी अशी मागणी विरोधकांनी केली आहे. संसदेचे अधिवेशन २६ जुलैपर्यंत चालणार आहे. ५ जुलैला केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन या अर्थसंकल्प सादर करतील. दरम्यान आज अधिवेशनाच्या आधी हंगामी अध्यक्ष म्हणून भाजपा खासदार विरेंद्र कुमार यांनी शपथ घेतली.

दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही अधिवेशनाच्या आधी जनतेशी संवाद साधला. सबका साथ सबका विकास हे आमचे धोरण आहे. विरोधकांनी संख्याबळाचा विचार करू नये आपलं मत मांडावं त्यांच्या मताचा आम्ही आदर करतो. तर्काच्या आधारे जी मतं मांडली जातील त्यावर नक्कीच विचार केला जाईल असंही मोदींनी स्पष्ट केलं.