पीटीआय, नवी दिल्ली : केंद्रातील नरेंद्र  मोदी सरकारला आठ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्ताने भाजपचे केंद्रीय मंत्री आणि भाजपशासित राज्य सरकारांच्या सर्व मंत्र्यांसह सर्व लोकप्रतिनिधी देशव्यापी जनसंपर्क अभियान हाती घेणार आहेत. त्याअंतर्गत सरकारने गरीबांच्या कल्याणार्थ राबवलेल्या विविध योजना आणि सुप्रशासनाची माहिती देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवण्यात येणार आहे, असे भाजपतर्फे शनिवारी सांगण्यात आले. भाजप मुख्यालयात घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस अरूण सिंग यांनी मोदींचे वर्णन विश्वासार्ह, लोकप्रिय, निर्णायक, त्याग करणारा आणि तपस्वी नेता असे करून अवघे राष्ट्र त्यांच्यामागे उभे असल्याचे सांगितले. 

सिंग यांनी सांगितले, की मोदी सरकारला आठ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल भाजप ३० मेपासून पंधरवडा साजरा करणार आहे. ३० मे  ते १४ जूनपर्यंत  मोदी सरकारचे प्राधान्य असलेल्या सुप्रशासन आणि गरीब कल्याण योजनांवर भर देत व्यापक जनसंपर्क अभियान आयोजित केले आहे. त्याचा एक भाग म्हणून ७५ तासांची स्थानिक ते राष्ट्रीय स्तरावरील जनसंपर्क मोहीम राबवण्यात येईल. त्यात सर्व केंद्रीय मंत्री, भाजपशासित राज्यांतील मंत्री आणि पक्षाचे सर्व लोकप्रतिनिधी गावोगावापर्यंत सहभागी होणार आहेत. या पंधरवडय़ातील प्रत्येक दिवशी शेतकरी, महिला,  अनुसूचित जाती- जमाती, इतर मागासवर्गीय आणि अल्पसंख्याकांपर्यंत पोहचण्यासाठी उपक्रम राबवण्यात येतील.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

३० मे रोजी पंतप्रधान मोदी ‘कोविड १९’ साथीत पालकांच्या मृत्यूने अनाथ झालेल्या बालकांसाठी मदतनिधीचा धनादेश देतील. त्यांच्यासाठी शिष्यवृत्ती योजनाही ते यावेळी जाहीर करतील, अशी माहिती यावेळी देण्यात आली. अल्पसंख्याकांबाबतही या जनसंपर्क अभियानात उपक्रम आहेत का, या प्रश्नावर सिंग यांनी सांगितले, की मोदी सरकार ‘सब का साथ, सब का विकास आणि सब का विश्वास’ या तत्त्वानुसार काम करते. त्यामुळे या सरकारच्या कल्याणकारी योजना नागरिकांबाबत कुठलाही भेदभाव करीत नाहीत.