येत्या १८ जुलै रोजी राष्ट्रपतीपदासाठी निवडणूक होत आहे. ही निवडणूक जिंकण्यासाठी विरोधी पक्ष तसेच सत्ताधारी पुरस्कृत उमेदवार समर्थनासाठी देशभर दौरे करत आहेत. असे असताना भाजपाने उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीवर लक्ष केंद्रीत केलं आहे. भाजपाने आज उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी एनडीए पुरस्कृत उमेदवाराची घोषणा केली आहे. या निवडणुकीसाठी भाजपाने पश्चिम बंगलाचे विद्यमान राज्यपाल जगदीप धनकड यांना उमेदवारी दिली आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि भाजपा यांच्यातील राजकीय वैर सर्वश्रूत आहे. त्यानंतर भाजपाने पश्चिम बंगालचे राज्यपाल धनकड यांनाच उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीची उमेदवारी दिल्यामुळे या निर्णयाचे वेगवेगळे राजकीय अर्थ लावले जात आहेत.

हेही वाचा >>> बंडखोरीच्या भीतीने काँग्रेसने पाच आमदारांना चेन्नईला हलवले; गोव्यात पुन्हा ऑपरेशन लोटस?

जगदीप धनकड (७१) सध्या पश्चिम बंगालचे राज्यपाल आहेत. या पदावर असताना ममता बॅनर्जी आणि धनकड यांच्यात अनेक वेळा वेगवेगळ्या कारणांमुळे संघर्ष झालेला पाहायला मिळालेला आहे. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी याच धनकड यांच्या उमेदवारीची आज घोषणा केली. या घोषणेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीदेखील धनकड यांच्या निवडीबद्दल आनंद व्यक्त केला. विशेष म्हणजे मोदी यांनी धनकड यांना शेतकरी पुत्र असं संबोधलं आहे. “शेतकरी पुत्र जगदीप धनखड हे त्यांच्या नम्रतेबद्दल ओळखले जातात. त्यांनी शेतकरी, तरुण, महिला तसेच उपेक्षितांच्या कल्याणासाठी कार्य केले आहे. ते आमचे उपराष्ट्रपतीदाचे उमेदवार असणार आहेत, याचा मला आनंद आहे,” अशी प्रतिक्रिया मोदी यांनी व्यक्त केली.

\हेही वाचा >>> “इतिहास चांगला असो किंवा…” औरंगाबाद नामांतर निर्णयावर इम्तियाज जलील यांची शिंदे-भाजपा सरकारवर सडकून टीका

जगदीप धनकड कोण आहेत?

जगदीप धनकड यांचा जन्म राजस्थानमध्ये झाला. त्यांनी चित्तोडगड येथील सैनिकी शाळेत प्राथमिक शिक्षण घेतले. जयपूरमध्ये पदवीपर्य़ंतचे शिक्षण पूर्ण केले. त्यांनी वकिलीचेदेखील शिक्षण घेतलेले असून काही काळ वकिली केलेली आहे. १९८९ ते १९९१ या काळात ते जनता दल पक्षाकडून झुंझूनू मतदारसंघातून खासदार होते. त्यांनी काही काळ काँग्रेस पक्षामध्येही काम केलेले आहे. पुढे २००३ साली त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला होता. २०१९ साली त्यांना पश्चिम बंगालच्या राज्यपलपदी नियुक्त करण्यात आले.

हेही वाचा >>> मंत्रिमंडळ विस्तार का गरजेचा? अजित पवार यांनी सांगितलं, “…काय अर्थ आहे” म्हणत शिंदे-फडणवीसांना केलं आवाहन

दरम्यान, देशाच्या १६ व्या उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक ६ ऑगस्टला होणार आहे. तर १९ जुलै ही उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे. विद्यमान उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांचा कार्यकाळ येत्या १० ऑगस्ट रोजी समाप्त होणार आहे.