संसदेच्या आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनात जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील घडामोडींच्या मुद्दय़ावर विरोधकांकडून होणारे हल्ले परतवून लावण्यासाठी भाजपनेही व्यूहरचना आखली असून समर्थपणे बाजू मांडण्याचे ठरविले आहे. विद्यापीठातील घटनेबाबत पक्षाच्या भूमिकेला जोरदार समर्थन मिळत असल्याने संसदेत बचावात्मक पवित्रा घेण्याची गरज नाही, असे मत पक्षाच्या बैठकीत व्यक्त करण्यात आले.
भाजपचे जय स्वाभिमान अभियान
भाजपने गुरूवारपासून तीन दिवसांचे जय स्वाभिमान अभियान हाती घेण्याचे ठरविले असून देशविरोधी कारवायांच्या विरोधात जनमत तयार करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
काश्मीरमधील अपक्ष आमदार रशीद यांना अटक
श्रीनगर : जेएनयूमधील विद्यार्थ्यांना पाठिंबा देण्यासाठी मोर्चा काढणारे जम्मू-काश्मीरमधील वादग्रस्त अपक्ष आमदार शेख अब्दुल रशीद यांना बुधवारी ताब्यात घेण्यात आले.
दिल्ली विद्यापीठातील माजी प्राध्यापक एसएआर गिलनी यांनी भारतविरोधी घोषणाबाजी केल्याने त्यांना अटक करण्यात आली असून त्याविरुद्धही रशीद यांनी मोर्चा काढला होता.
रशीद यांना प्रतिबंधात्मक अटक करण्यात आली असून राजबाग पोलीस ठाण्यात ठेवण्यात आले आहे. त्यांना झीरो पुलाजवळ अडविण्यात आले आणि मोर्चा स्थगित करण्यास सांगण्यात आले. मात्र त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केल्याने त्यांना ताब्यात घेण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.
