भाजपासाठी दि. २३ मार्च हा दिवस विशेष ठरला आहे. शुक्रवारी या पक्षाने राज्यसभेच्या १२ जागा जिंकल्या आहेत. या विजयामुळे भाजपा आता राज्यसभेतील सर्वांत मोठा पक्ष ठरला आहे. या सर्वांमध्ये उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासाठीही हा विजय खूप महत्वाचा ठरला. पोटनिवडणुकीत झालेल्या पराभवाचा बदला त्यांनी घेतल्याचे बोलले जात आहे. शुक्रवारी राज्यसभेच्या ७ राज्यातील २६ जागांसाठी मतदान झाले होते. यापैकी १२ जागांवर कमळ फुलले आहे. उत्तर प्रदेशमधील सर्व उमेदवार विजयी झाले आहेत. आता भाजपाचे राज्यसभेत ७३ खासदार झाले आहेत. विशेष म्हणजे उत्तर प्रदेशमधील नववी जागा ही अतिरिक्त होती. या जागेवरून उत्तर प्रदेशच्या राजकारणात अनेक नाट्यमय घडामोडी पाहायला मिळाल्या. बसपा, सपा आणि काँग्रेसने एकमेकांवर क्रॉस व्होटिंगचा आरोप केल्याचे दिसते.

या निवडणुकीच्या यश मिळाल्यानंतर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना विरोधी पक्षांवर निशाणा साधला. सपाची अतिरिक्त मते बसपाच्या उमेदवाराला गेली नाहीत. बसपासाठी हा एक मोठा धडा होऊ शकतो. सपाचा स्वार्थी चेहरा लोकांनी पाहिला आहे. समाजवादी पक्ष घेऊ शकतो, देऊ शकत नाही. समजदार ठोकर से समझते है, असे म्हणत टोला लगावला.

राज्यसभेसाठी उत्तर प्रदेशमधून भाजपाच्या ९ उमेदवारांचा विजय झाला आहे. यामध्ये अरूण जेटली, जीव्हीएल नरसिंहा राव, अनिल जैन, डॉ. अशोक वाजपेयी, विजयपालसिंह तोमर, सकलदीप राजभर, हरनाथसिंह यादव, अनिल अग्रवाल आणि कांता कर्दम यांचा समावेश आहे.

उत्तर प्रदेशमधील पोटनिवडणुकीत गोरखपूर आणि फुलपूर येथे समाजवादी पक्षाने अनपेक्षितरत्या भाजपाचा पराभव केला होता. गोरखपूर हा मुख्यमंत्री आदित्यनाथ यांचा तर फुलपूर हा उपमुख्यमंत्र्यांचा मतदारसंघ होता. त्यामुळे भाजपामध्ये थोडे नैराश्याचे वातावरण आले होते. परंतु, राज्यसभेतील विजयामुळे कार्यकर्त्यांमध्येही चैतन्य पसरल्याचे दिसून येत आहे.