पीटीआय, नवी दिल्ली

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त भाजपची सत्ता असलेल्या राज्यांमध्ये आरोग्य तपासणी, स्वच्छता मोहीम, प्रदर्शन, जनजागृतीसह विकासविषयक उपक्रम राबवण्यात आले. भाजपकडून देशभरात बुधवारपासून सेवा पंधरवड्यास सुरूवात करण्यात आली.

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी शुभेच्छा संदेशात म्हटले की, गरीब घरातून येऊन पंतप्रधानपदापर्यंत पोचलेल्या मोदी यांच्याकडून जीवनात मोठे ध्येय डोळ्यासमोर ठेऊन ते मेहनतीने पूर्ण करण्याची प्रेरणा देशावसियांना मिळाली आहे.

उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन, लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला, संरक्षण मंत्री राजनाथ सिंग, गृहमंत्री अमित शाह, भाजपचे अध्यक्ष जे. पी नड्डा यांनीही पंतप्रधानांना शुभेच्छा दिल्या. लोकसभेतील काँग्रेसचे विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांच्यासह पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे, समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनीही त्यांना यानिमित्ताने आरोग्यदायी जीवनासाठी सदिच्छा व्यक्त केल्या.

वडनगर स्थानकात नवा स्टॉल

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून ‘इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन लिमिटेड’ने (आयआरसीटीसी) गुजरातमधील वडनगर रेल्वे स्थानकात नवीन आधुनिक फूड प्लाझा सुरू केला. हा फूड प्लाझा ‘चहा’ या संकल्पनेवर आधारित आहे. पंतप्रधान मोदी यांचे वडील उपजीविकेसाठी वडनगर रेल्वे स्थानकावर चहा विकत होते. नरेंद्र मोदी बालपणी वडनगर रेल्वे स्थानकात चहा विक्री करत असल्याचे सांगितले जाते.

एक कोटी वृक्षलागवड

या दिवसाचे औचत्य साधून ओडीशा सरकारने बुधवारी एक कोटी वृक्षलागवड मोहीम राबवली. त्यातील ७५ लाख रोपांची लागवड दुपारी १.३३ वाजेपर्यंत पूर्ण करण्यात आल्याचे सांगण्यात आले.

माझे मित्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबरोबर दूरध्वनीवरून उत्तम संभाषण झाले. मी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. ते फार उत्कृष्ट काम करत आहेत. नरेंद्र, रशिया-युक्रेन युद्ध थांबवण्यासाठी केलेल्या मदतीसाठी आभार! – डोनाल्ड ट्रम्पअध्यक्ष, अमेरिका

रशिया आणि भारतादरम्यानचे संबंध दृढ करण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्तिश: मोठे योगदान दिले. राष्ट्रप्रमुख म्हणून तुम्ही तुमच्या समकक्षांकडून मोठा आदर आणि जागतिक पातळीवर अधिकार मिळवला आहे. व्लादिमिर पुतिनअध्यक्ष, रशिया .

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा. त्यांना उत्तम आरोग्य लाभो. –राहुल गांधीकाँग्रेस नेते

अस्थिर काळात चांगला मित्र हवा असतो. मोदी यांनी ब्रिटनसाठी त्या मित्राची भूमिका कायम बजावली. ऋषी सुनकब्रिटनचे माजी पंतप्रधान