देशातील सार्वत्रिक लोकसभा निवडणुकांतील विजयानंतर आज(शनिवारी) दिल्लीतील भाजप कार्यालयात पक्षाच्या संसदीय समितीच्या बैठकीला घेण्यात आली . निवडणुकीतील विजयानंतर पक्षाची आगामी रणनीती ठरविण्यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीनंतर आयोजित करण्यात आलेल्या पत्रकारपरिषदेत पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजनाथ सिंह आणि भाजप नेत्यांनी नरेंद्र मोदींचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. यावेळी भाजपचे अनेक वरिष्ठ नेते आणि संसदीय मंडळातील सर्व सदस्य उपस्थित होते.
येत्या २० तारखेला भाजपच्या संसदीय मंडळाची अंतिम बैठक होणार असून यामध्ये संसदीय मंडळाच्या प्रमुख नेत्याची निवड करण्यात येणार असल्याची माहिती भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष राजनाथ सिंह यांनी पत्रकारपरिषदेत दिली. तसेच २० तारखेच्या बैठकीत नरेंद्र मोदी यांच्या नावाची अधिकृत घोषणा होणार असल्याची शक्यतासुद्धा राजनाथ यांनी वर्तविली. दरम्यान भाजपकडून पंतप्रधापदाच्या शपथविधीची तारीख अद्याप निश्चित करण्यात आली नसून २० तारखेच्या बैठकीनंतर आणि एनडीएच्या घटक पक्षांशी चर्चा करून याबाबत निर्णय घेतला जाईल असे राजनाथ सिंह यांनी सांगितले.