आंध्र प्रदेशला विशेष राज्याचा दर्जा न दिल्यामुळे तेलुगू देशम पक्षाने (टीडीपी) राष्ट्रीय लोकशाही आघाडीला (रालोआ) सोडचिठ्ठी दिली. त्यानंतर भाजपा अध्यक्ष अमित शहा यांनी आज टीडीपीचे सर्वेसर्वा आणि आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांना पत्र लिहिले असून एनडीएतून बाहेर पडण्याचा हा निर्णय राजकीय हेतूने प्रेरित आणि एकतर्फी असल्याची टीका त्यांनी केली आहे. आंध्र प्रदेशच्या विकासाबाबत मोदी सरकार कटिबद्ध असून त्यावर कोणी शंका घेऊ शकत नाही. रालोआतून बाहेर पडण्याचा तुमचा निर्णय दुर्दैवी असून तुम्ही राज्याच्या विकासाकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप शहा यांनी केला. भाजपा नेहमीच विकासाच्या राजकारणावर विश्वास ठेवणारा पक्ष असून हीच आमची प्रेरणा असल्याचे ते म्हणाले. शहा यांनी या पत्राच्या माध्यमातून काँग्रेसवर टीका करण्याची संधी सोडली नाही. काँग्रेसमुळेच तेलुगू जनतेची अवहेलना होत असल्याचा आरोप त्यांनी केला. उगादीच्या शुभेच्छा देत त्यांनी पत्राची सुरूवात केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शहा यांनी पत्रात म्हटले की, आंध्र प्रदेशच्या विभाजनापासून आजपर्यंत भाजपाने नेहमी आंध्र प्रदेशच्या लोकांसाठी आवाज उठवला आहे. लोकांच्या हितासाठी काम केले आहे. आम्ही सातत्याने तेलुगू जनता आणि तेलुगू राज्याच्या हिताबाबत विचार केला आहे. काँग्रेसने राज्याचे विभाजन करताना लोकांच्या हिताची काळजी घेतली नाही. त्यामुळे लोकांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागतोय. विभाजनावेळी काँग्रेसने लोकांच्या संवेदनांची काळजी घेतली नाही, असे म्हणत चंद्राबाबूंना त्यांनी २०१४ च्या लोकसभा निवडणुकीची आठवण करून दिली. जेव्हा तुमच्याकडे राज्यसभा आणि लोकसभेत पुरेशा जागा नव्हत्या. तेव्हाही भाजपाने राज्यातील लोकांना न्याय देण्याच्या विषयांना सभागृहात प्राथमिकता दिली होती.

आंध्र प्रदेशचा विकास आमच्या सरकारच्या अजेंड्यावर सर्वात वर आहे. त्यामुळेच आम्ही शैक्षणिक संस्था, आधारभूत संरचना समवेत अनेक विकासकार्यांसाठी विशेष सहकार्य करत आहोत, असे सांगितले. आंध्र प्रदेशच्या विकासासाठीच आपल्या दोघांना जनादेश मिळाला होता, असेही त्यांनी पत्रात स्पष्ट केले.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp president amit shah write a letter to tdp chief cm chandrababu naidu and blamed
First published on: 24-03-2018 at 15:10 IST