उमाकांत देशपांडे
राममंदिर, शेतकरी प्रश्नांना अग्रक्रम
लोकसभा निवडणुकीसाठी भाजपचा राष्ट्रीय जाहीरनामा प्रकाशित झाल्यावर महाराष्ट्रात भाजप-शिवसेना व अन्य घटकपक्षांच्या महायुतीचा संयुक्त जाहीरनामा प्रकाशित करण्यात येणार आहे.
अयोध्येत राममंदिर बांधण्यासह राज्यातील शेतकऱ्यांचे प्रश्न, झोपडपट्टीवासीयांसह सर्वाना हक्काचे घर, औद्योगिक विकास, पायाभूत सुविधा प्रकल्प आदी मुद्दय़ांचा समावेश जाहीरनाम्यात असेल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि ज्येष्ठ शिवसेना नेते व उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले.
भाजपच्या राष्ट्रीय जाहीरनाम्यात राम मंदिरासह पंतप्रधानांच्या सर्वासाठी घर व अन्य राष्ट्रीय योजनांचा आणि नवीन योजनांचा समावेश असणारच आहे. महाराष्ट्रात शिवसेनेबरोबर युती असल्याने आणि शिवसेनेच्या आग्रहामुळे त्यांच्या काही मुद्दय़ांसह राज्यस्तरीय मुद्दय़ांचा संयुक्त जाहीरनामा प्रकाशित करण्यात येईल. शिवसेनेने हिंदुत्वाच्या मुद्दय़ावर भाजपशी युती केली असून उद्धव ठाकरे यांनी अयोध्या दौराही काही महिन्यांपूर्वी केला.
त्यामुळे राममंदिर उभारणीचे आश्वासन जाहीरनाम्यात असेल. महाराष्ट्रात शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण अजूनही मोठे असून कर्जमाफीचे लाभ अजूनही सर्व शेतकऱ्यांना मिळालेले नाहीत. शेतकऱ्यांचे प्रश्न अजूनही कायम आहेत. ते सोडविण्याच्या दृष्टीने जाहीरनाम्यात आश्वासने दिली जाणार आहेत.
मेट्रो, मोनो प्रकल्प, नागपूर-मुंबई समृद्धी महामार्ग, कोस्टल रोड आदी महत्त्वाकांक्षी प्रकल्प राज्यात उभारले जात आहेत. औद्योगिक विकास वाढीसाठी राज्य सरकारने अनेक उपाययोजना केल्या आहेत आणि उद्योगांसाठी लाल गालिचा अंथरला आहे. त्यातून रोजगारनिर्मिती वाढविण्यावर भर आहे. औद्योगिक विकास आणि बेरोजगारी दूर करण्यासह काही मुद्दय़ांचा जाहीरनाम्यात समावेश करण्यात येणार आहे.
शिवसेनेने गेल्या विधानसभा आणि महापालिका निवडणुकीच्या वेळी व्हिजन डॉक्युमेंट काढले होते. आरोग्य, शिक्षण व अन्य क्षेत्रांतील काही योजनांचा व मुद्दय़ांचा समावेश या जाहीरनाम्यात करण्यात येणार असल्याचे उच्चपदस्थ सूत्रांनी सांगितले.
