भाजपला पुन्हा सत्तेत यायचे असल्यास आगामी लोकसभा निवडणुकीत पक्षाचे नेतृत्व गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्याकडे सोपवावे, असे मत योगगुरू रामदेव यांनी रविवारी व्यक्त केले. भाजपने आपल्या प्राथमिकतांमध्ये काही बदल करून आगामी लोकसभा निवडणुकीसाठी नरेंद्र मोदींना अधिक संधी दिली तर केंद्रात बदलाची शक्यता दिसून येते, असेही रामदेव येथे एका पत्रकार परिषदेत म्हणाले. मोदी एक सक्षम नेतृत्व म्हणून पुढे आले आहेत. विकासाला चालना देणारे आणि साहसी नेतृत्वाचे प्रतीक तसेच भ्रष्टाचाराला थारा न देणारे म्हणूनही मोदी ओळखले जात आहेत. मात्र निवडणुकीसाठी त्यांच्याकडे नेतृत्व देण्याबाबतचा निर्णय भाजप आणि संघ घेईल, असेही रामदेव यांनी स्पष्ट केले.