भाजपाकडून कायमच पारदर्शक कारभाराच्या बाता मारल्या जातात. आम्ही कायमच पारदर्शक कारभार करतो असाही दावा भाजपाने वारंवार केला आहे. अशात आता एम. जे. अकबर यांच्यावर लैंगिक शोषण आणि अत्याचाराचे आरोप काही महिलांनी #MeToo या मोहिमे दरम्यान केले आहेत. मग अशा माणसाचा राजीनामा घेऊन भाजपा आपल्या पारदर्शी कारभाराची साक्ष का पटवून देत नाही? असा प्रश्न शिवसेनेच्या आमदार मनिषा कायंदे यांनी विचारला आहे. त्यांच्या राजीनाम्याबाबत भाजपाने योग्य निर्णय घेतला पाहिजे तसेच त्यांनी त्यांच्यावर झालेल्या आरोपांच्या चौकशीला त्यांनी सामोरे गेले पाहिजे असेही कायंदे यांनी म्हटले आहे. एम. जे अकबर यांच्यावर झालेले आरोप गंभीर आहेत असेही मनिषा कायंदे यांनी म्हटले आहे.

#MeToo प्रकरणात परराष्ट्र राज्यमंत्री एम. जे अकबर यांच्यावर अनेक महिलांनी आरोप केले आहेत. अकबर हे पत्रकार म्हणून काम करत होते. त्यावेळी पत्रकारितेच्या दीर्घ कारकिर्दीमध्ये आपल्या पदाचा गैरवापर करत नवीन महिला पत्रकारांचा गैरफायदा घेत लैंगिक छळ केल्याचा आरोप अनेक महिलांनी केला आहे. हॉटेलमध्ये रात्री अपरात्री बोलावणे, केबिनमध्ये कारण नसताना बोलावून लगट करणे असे अनेक आरोप त्यांच्यावर काही महिला पत्रकारांनी ट्विटरच्या माध्यमातून केले आहेत. विशेष म्हणजे काही महिलांनी याला वाचा फोडल्यानंतर आपणहून आणखी काही महिला पत्रकार पुढे आल्या व त्यांनीही अकबर हे पशूसमान होते असे सांगत आपले दुर्दैवी अनुभव कथन केले. त्यांच्या राजीनाम्याची मागणीही जोर धरू लागली आहे. अशात शिवसेनेनेही तिच मागणी करत भाजपाची कोंडी करण्याचा प्रयत्न केला आहे.

केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी एम. जे अकबर यांनी या सगळ्या प्रकरणी त्यांच्यावर झालेल्या आरोपांना उत्तर द्यायला हवं असं म्हटलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मात्र या सगळ्या प्रकरणावर मौन सोडलेले नाही. त्यामुळे काँग्रेस, राष्ट्रवादीसह अन्य विरोधी पक्ष सत्ताधाऱ्यांवर टीका करत आहेत. अशात भाजपाचा मित्र पक्ष असलेल्या शिवसेनेनेही पारदर्शक कारभाराचा हवाला देत एम. जे. अकबर यांचा राजीनामा भाजपाने घ्यावा अशी मागणी केली आहे.