पाकिस्तानचे पंतप्रधान रझा अश्रफ यांच्या अजमेर शरीफ दर्गाभेटीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय दग्र्याचे दिवाण झैनुल अबेदिन अली खान यांनी घेतला असून त्याचे भाजपने स्वागत केले आहे.
दिवाण यांनी घेतलेला निर्णय स्वागतार्ह आहे, केंद्र सरकारचे त्याबाबतचे मत काय आहे, त्याची आपल्याला कल्पना नाही, असे भाजप नेते व्यंकय्या नायडू यांनी म्हटले आहे. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर भारतीय जवानाचा शिरच्छेद केल्याच्या निषेधार्थ आपण अश्रफ यांच्या दर्गाभेटीवर बहिष्कार टाकल्याचे झैनुल खान यांनी म्हटले आहे.
तिसऱ्या आघाडीचा यापूर्वी झालेला प्रयत्न फसला होता, त्यामुळे केवळ भाजपप्रणीत एनडीएच केंद्रातील यूपीएला सशक्त पर्याय देऊ शकतो, त्यामुळे एनडीएला जनतेने सत्तेवर बसवावे, असेही नायडू म्हणाले. यूपीएच्या राजवटीत देशात भ्रष्टाचार बोकाळला असून त्यामुळे देशाची प्रतिमा मलिन झाली आहे, असेही ते म्हणाले. दहशतवादाविरोधात यूपीएला कोणताही ठोस निर्णय घेता आलेला नाही, त्यामुळे भारतात असुरक्षितता असल्याचे मत केंद्र सरकारनेच निर्माण केले आहे. दहशतवादाच्या मुद्दय़ाचे यूपीएने राजकीय भांडवल केले आणि आपल्या मतांसाठी अफझल गुरूला फाशी देण्यास विलंब लावला, असेही नायडू म्हणाले.