Bihar Assembly Election 2025 : बिहार विधानसभेच्या निवडणुकीमध्ये एनडीएला घवघवीत यश मिळालं आहे. एनडीएने तब्बल २०२ जागा जिंकल्या आहेत, तर विरोधकांना फक्त ३५ जागा जिंकता आल्या आहेत. दरम्यान, बिहार निवडणुकीच्या निकालाच्या दुसऱ्याच दिवशी एक महत्वाची बातमी समोर आली आहे. बिहार निवडणुकीत बंडखोरी करणाऱ्या तीन बड्या नेत्यांवर भारतीय जनता पक्षाने कारवाई करत पक्षातून हकालपट्टी केली आहे.
माजी केंद्रीय मंत्री आरके सिंह, अशोक कुमार अग्रवाल आणि कटिहारच्या महापौर उषा अग्रवाल यांना भाजपामधून ६ वर्षांसाठी निलंबित करण्यात आलं आहे. बिहारच्या निवडणुकीत पक्षविरोधी कारवाया केल्याचा आणि पक्षाच्या संघटनात्मक शिस्तीचं वारंवार उल्लंघन केल्याचा ठपका ठेवत ही कारवाई करण्यात आल्याचं सांगण्यात आलं आहे. या संदर्भातील वृत्त इंडिया टुडेनी दिलं आहे.
दरम्यान, बिहारच्या निवडणुकीत बंडखोरी होऊ नये, म्हणून पक्षाकडून सातत्याने प्रयत्न करण्यात आले. पण तरीही या तीन नेत्यांनी बंडखोरी करत पक्षविरोधी कारवाया केल्याचा आरोप भाजपाने केला आहे. या संदर्भात भाजपाने त्यांना कारणे दाखवा नोटीसही बाजवली होती. तसेच त्यावर एका आठवड्यात स्पष्टीकरण देण्यासही सांगितलं होतं. मात्र, निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर दुसऱ्याच दिवशी या तीनही नेत्यांची भाजपाने थेट पक्षातून हकालपट्टी केली आहे.
माजी केंद्रीय मंत्री आरके सिंह यांच्याबाबत भाजपाने म्हटलं की, “तुम्ही पक्षविरोधी कारवाया करत आहात, त्यामुळे पक्षाचं नुकसान झालं आहे, त्यामुळे तुम्हाला निलंबित केलं जात आहे. तसेच तुम्हाला पक्षातून काढून का टाकू नये? याचं स्पष्टीकरण द्या, असं नोटीसमध्ये नमूद केलं. या संदर्भातील पत्र जारी केल्यानंतर पुढच्या काही तासांतच पक्षाने त्यांचं प्राथमिक सदस्यत्वही रद्द केल्याचं सांगितलं. दरम्यान, माजी केंद्रीय मंत्री आरके सिंह यांच्यावरी हकालपट्टीची ही कारवाई म्हणजे भाजपाच्या कडक पावलांपैकी हे एक पाऊल असल्याचं बोललं जात आहे.
