नवी दिल्ली : राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत भाजपकडे पुरेसे संख्याबळ नाही. बहुमताचा आकडा गाठण्यासाठी महाराष्ट्रात भाजपचा सत्तेसाठी खेळ चालला आहे, अशी टीका काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खरगे  यांनी केली. महाराष्ट्रात अडीच वर्षे महाविकास आघाडी सरकारचा नीट कारभार सुरू असताना ते अचानक अस्थिर कसे झाले? त्यामागे भाजपचे षड्यंत्र आहे, असा आरोप खरगे यांनी गुरुवारी पत्रकारांशी बोलताना केला.

शिवसेनेच्या आमदारांना आधी सुरतला, त्यानंतर त्यांना गुवाहाटीला नेले गेले. हे कसे झाले? सुरतमध्ये कोणाचे सरकार आहे, ते तुम्हाला माहिती आहे. आमदारांच्या नेण्यात भाजपचा हात आहे, त्याशिवाय इतक्या आमदारांना एकाच वेळी राज्याबाहेर नेणे शक्य झाले नसते, असे खरगे म्हणाले.

राज्यातील घडामोडींसंदर्भात शिवसेनेचे नेते संजय राऊत यांच्याशी बोलणे झाले आहे. गुवाहाटीतील शिवसेनेच्या आमदारांनी मुंबईत येऊन बोलावे, त्यांची नाराजी दूर केली जाईल, असे राऊत यांनी स्पष्ट केले आहे. शिवसेना सोडणार नाही, असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले आहे. खऱ्या शिवसैनिकांनी उद्धव ठाकरेंशी चर्चा केली पाहिजे. शिवसेनेचे बंडखोर आमदार परत येतील व समस्येतून मार्ग निघेल, अशी आशा खरगेंनी व्यक्त केली.

काँग्रेसचा पूर्ण पाठिंबा

महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचे सरकार मजबूत आहे, ते समक्षपणे चालवले जात आहे. देशात एकही बिगरभाजप सरकार सत्तेवर असू नये, हीच भाजपची इच्छा असल्याने महाराष्ट्रातील आघाडी सरकार पाडण्याचा प्रयत्न केला जात आहे, असाही आरोप खरगे यांनी केला. महाराष्ट्रातील लोक निर्धाराने काम करणारे आहेत. ते विकासासाठी एकत्र येतात. विकासासाठीच महाविकास आघाडीतील तीनही पक्षांनी किमान समान कार्यक्रम तयार केलेला आहे, असे खरगे म्हणाले.

ही सरकारे कशी गेली?

भाजपने अनेक राज्यांतील बिगरभाजप सरकारे पाडली आहेत. उत्तराखंड, कर्नाटक, मध्य प्रदेश, गोवा, मणिपूर या राज्यांतील काँग्रेस सरकारे कशी गेली, हे सगळय़ांना माहिती आहे. ईडी, सीबीआयसारख्या तपास यंत्रणांच्या मदतीने ‘तोडफोड’ करून लोकनियुक्त सरकारे भाजपने पाडली गेली, आता हाच खेळ महाराष्ट्रातही चाललेला आहे. पण, महाराष्ट्रात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस एकत्रितपणे हे सरकार टिकवू. त्यासाठी काँग्रेस सर्वतोपरी मदत करेल, असे खरगे म्हणाले.