“४ जूनला देशातील जुमला पर्व संपणार आहे आणि २०१४ रोजी मोदींनी जे अच्छे दिनाचे आश्वासन दिले होते. त्या अच्छे दिनाची सुरुवात ४ जूनपासून होईल, अशी खोचक टीका उद्धव ठाकरे यांनी इंडिया आघाडीच्या संयुक्त पत्रकार परिषदेत केली. गेल्या काही काळापासून केंद्रीय यंत्रणांचा वापर करून भ्रष्टाचाराचे आरोप ज्यांच्यावर झाले, त्यांनाच भाजपात घेऊन त्यांचा सन्मान करण्यात आला, असेही ते म्हणाले. मुंबईच्या हॉटेल ग्रँड हयात येथे इंडिया आघाडीच्या पत्रकार परिषदेला काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार आणि शिवसेना उबाठा गटाचे नेते उद्धव ठाकरे यांनी आपली भूमिका मांडली.

“महाराष्ट्राला बदनाम करण्याचा प्रयत्न भाजपाकडून होत आहे. मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी असून त्यांना ती बघवत नाही. त्यामुळे मुंबईची लूट करून सर्व काही गुजरातला नेण्याचा प्रयत्न होत आहे. मुंबई आणि महाराष्ट्राची लूट इंडिया आघाडीचे सरकार थांबवेल”, असे आश्वासन उद्धव ठाकरे यांनी दिले.

संघालाही आता नकली म्हटले जाईल

उद्धव ठाकरे पुढे म्हणाले, “घटनाबाह्य सरकारचा प्रचार पंतप्रधान करत आहेत. स्वतंत्र भारतात पहिल्यांदाच असे घडत आहे. कारण सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय प्रलंबित असताना पंतप्रधान घटनाबाह्य मुख्यमंत्री आणि घटनाबाह्य उपमुख्यमंत्र्यांना घेऊन प्रचाराला फिरत आहेत. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा हे काही दिवसांपूर्वी बोलले होतेच की, देशात भाजपा हा एकच पक्ष राहिला पाहीजे. तसेच आम्हाला ज्याप्रमाणे नकली शिवसेना म्हटले जात आहे. त्याप्रमाणे भाजपाचे लोक राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही नकली आरएसएस म्हणतील. योगायोगाने जेपी नड्डा यांची आजच इंडियन एक्सप्रेसमध्ये मुलाखत आलेली वाचली. त्यात ते म्हणतात की, भाजपा आता स्वंयपूर्ण झाली असून त्यांना संघाची गरज नाही. संघालाही नष्ट करण्याचा कारभार भाजपाकडून सुरू आहे. हीच हुकूमशाहीची नांदी आहे.”

पंतप्रधान मोदी यांनी शिवाजी पार्कवरून भाषण करत असताना शरद पवार यांना आव्हान दिले की, त्यांनी राहुल गांधींना पुन्हा सावरकरांवर बोलण्यापासून रोखावे. आज पत्रकार परिषदेत शरद पवारांना हा प्रश्न विचारण्यात आला. यावेळी ते म्हणाले, “कारण नसताना चिथावणी देण्याचं काम मोदी करत आहेत. मोदी यांचं शिवाजी पार्कवरील संपूर्ण भाषण ही धर्मांध प्रवृत्ती कशी वाढेल? हा दृष्टीकोन समोर ठेवून केलं आहे. आज सामाजिक ऐक्य हा विषय हा सर्व देशाच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. पंतप्रधान पदाची जबाबदारी ज्यावर आहे, त्याने या संदर्भात तारतम्य दाखविण्याची आवश्यकता आहे. पण दुर्दैव असे आहे की, हे पहिले पंतप्रधान आहेत, जे सामाजिक ऐक्याला स्थान आहे.”