नवी दिल्ली : भारताच्या स्वातंत्र्यासंदर्भात भाजप युवा मोर्चाच्या कार्यकत्र्या रुची पाठक यांनी केलेल्या बिनबुडाच्या आणि भन्नाट दाव्यानंतरदेखील भाजपने पाठक यांच्यावर कारवाई केलेली नाही. या तरुण प्रवक्त्यांना ना समज देण्यात आली, ना पक्षाने त्यांच्याकडे स्पष्टीकरण मागितले. पाठक झांसीच्या स्थानिक प्रवक्त्या असल्याने राष्ट्रीय स्तरावरून पक्षाने पाठक यांच्या विधानांकडे कानाडोळा केला आहे. पाठक यांच्या विधानांवर भाजपमधून कोणीही प्रतिक्रिया व्यक्त केलेली नाही.

ब्रिटिशांकडून नेहरू आणि गांधींनी ९९ वर्षांच्या भाडेकरारावर स्वातंत्र्य मिळवले असून देशाला अजूनही पूर्णत: स्वातंत्र्य मिळालेले नाही, असे विधान करून पाठक यांनी जबरदस्त ‘खळबळ’ उडवून दिली होती. देशात स्वातंत्र्यलढा लढला जात होता, मात्र ब्रिटनची राणी भारताला स्वातंत्र्य द्यायला तयार नव्हती. मग, नेहरूंनी संविधानाला साक्षी मानून नव्हे तर ब्रिटनच्या राणीच्या वतीने पंतप्रधानपदाची शपथ घेतली होती, असेही पाठक म्हणाल्या होत्या. राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना १९५१ मध्ये झाल्याचेही पाठक यांचे म्हणणे होते. आपली ही सगळी विधाने सत्य असून वेळ दिला तर ते पुराव्यानिशी सिद्ध करण्याचा दावाही त्यांनी केला होता. ‘ललन टॉप’ या हिंदीतील वृत्तसंकेतस्थळाच्या वतीने आयोजित परिसंवादामध्ये रुची पाठक सहभागी झाल्या होत्या. चर्चा खासगीकरणावर होत होती. काँग्रेसचे प्रवक्ते गौरव जैन यांच्या मुद्द्यांना प्रत्युत्तर देताना रुची पाठक यांनी भारताच्या स्वातंत्र्यावर हे ‘बिनधास्त’ भाष्य केले होते.

‘व्हॉट्सअ‍ॅप विद्यापीठ’

भाजपचे बहुतांश प्रवक्ते ‘व्हॉट्सअ‍ॅप विद्यापीठा’तून पदवी घेऊन आले असल्याने चुकीची माहिती आत्मविश्वासाने लोकांच्या गळी उतरवतात. भाजपला इतिहास, तथ्य यांच्याशी काहीही देणे-घेणे नाही. बनावट गोष्टींवर भाजप टिकून असल्याची टीका जैन यांनी केली.

१९५१-५२ मध्ये निवडणूक प्रचारात नेहरू म्हणाले होते की, लाखो लोकांनी एकाच व्यक्तीला हो म्हणत मान तुकवावी असा देश मला नको. पण, ७० वर्षांनी भारत कुठे येऊन पोहोचला आहे बघा. लसीकरणाच्या प्रशस्तिपत्रकावर स्वत:चे छायाचित्र छापणाऱ्या आत्ताच्या पंतप्रधानांनी काँग्रेसमुक्त भारत करण्याचा विडा उचलला आहे, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे खासदार शशी थरूर यांनी व्यक्त केली आहे.

भाजपच्या आर्थिक धोरणामध्ये खासगीकरणाला महत्त्व दिले जात असल्याने त्यांच्या पक्षाच्या प्रवक्त्यांनाही आपला देश कोणाला तरी चालवायला दिला आहे असे वाटत असावे, अशी उपहासात्मक टिप्पणी भाकपचे नेते भालचंद्र कानगो यांनी केली.

पाठक म्हणतात, बोलण्याच्या ओघात…

भाजप युवा मोर्चाच्या प्रवक्त्या रुची पाठक यांनी मात्र बोलण्याच्या ओघात विधाने केल्याचे म्हटले आहे. अशी विधाने करून देशवासीयांच्या भावना दुखावण्याचा हेतू नव्हता. देशाच्या संविधानावर आक्षेपही घ्यायचा नव्हता. ही विधाने पक्षाच्या वतीने नव्हे तर वैयक्तिक आहेत. माझी माहिती कदाचित चुकीची असू शकेल. मी काही ब्लॉग आणि ‘स्वदेशी’चा आग्रह धरणारे राजीव दीक्षित यांच्या विधानांचा आधार घेतला, असे स्पष्टीकरण पाठक यांनी दिले आहे.