करोनाशी लढण्यासाठी पीएम केअर फंडकडून ३१०० कोटींचं वाटप करण्यात आलं आहे. पंतप्रधान कार्यालयाकडून ही माहिती देण्यात आली आहे. महत्त्वाचं म्हणजे यामध्ये स्थलांतरित मजुरांसाठीही मोठी तरतूद करण्यात आली आहे. पंतप्रधान कार्यालयाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, स्थलांतरित मजुरांसाठी १००० कोटी खर्च केले जाणार आहेत. याशिवाय व्हेंटिलेटर खरेदी आणि लसनिर्मितीसाठी ही रक्कम वापरण्यात येणार असल्याचंही सांगण्यात आलं आहे. यावरून बॉलिवूडचे अभिनेते अनुपम खेर यांनी पीएम केअर फंडवर टीका करणाऱ्यांवर हल्लाबोल केला आहे. ही तर त्या दु:खी आत्म्यांच्या चेहऱ्यावर मारलेली चपराक आहे, असं म्हणत त्यांनी विरोधकांवर निशाणा साधला.
पीएम केअर फंडकडून ३१०० कोटी रूपयांचं वाटप करण्यात आल्याची माहिती देणाऱ्या ट्विटला रिट्विट करत अनुपम खेर यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. “ज्या या फंडमध्ये कोणत्या प्रकारचं षड्यंत्र आहे असं वाटत होतं त्या सर्व दु:खी आत्म्यांच्या चेहऱ्यावर लगावण्यात आलेली ही जोरदार चपराक आहे. आता याचा आवाज सर्वांना ऐकू येईल आणि नक्कीच ऐकू येईल,” असं म्हणत त्यांनी या फंडावर टीका करणाऱ्यांवर निशाणा साधला आहे.
एक ज़ोरदार तमाचा उन सभी दुखी आत्माओं के चेहरों पर जिनको इस फंड में भी कोई साज़िश नज़र आ रही थी।अब इस थप्पड़ की गूंज सबको सुनाई देगी। ज़रूर सुनाई देगी। #PMCaresFund https://t.co/e8ijLHJ62A
— Anupam Kher (@AnupamPKher) May 13, 2020
पंतप्रधान कार्यालयाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, करोनाशी लढा देण्यासाठी पीएम केअर फंडकडून ३१०० कोटींचं वाटप करण्यात आलं आहे. यामधील २००० कोटी रुपये व्हेटिलेटरची खरेदी करण्यासाठी वापरले जाणार आहे. तर १००० कोटी रुपये स्थलांतरित मजुरांची काळजी घेण्यासाठी वापरले जाणार आहे. तर उर्वरित १०० कोटी रुपये लसनिर्मिती करण्यासाठी खर्च करण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी करोनाविरोधात लढण्यासाठी PM-Cares फंडची निर्मिती केली होती. यावेळी त्यांनी लोकांना पीएम केअर फंडसाठी मदत करण्याचं आवाहन केलं होतं. त्यांनी ट्विट करत सांगितलं होतं की, “देशभरातील लोकांनी करोनविरोधीत लढाईत मदत करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. ही भावना लक्षात घेता पीएम केअर फंडची निर्मिती केली आहे. निरोगी भारताची निर्माण करण्यात हे महत्त्वाची भूमिका बजावेल”.