Bomb Blast in Pakistan : वायव्य पाकिस्तानातील दक्षिण वझिरिस्तान येथे सोमवारी झालेल्या एका स्फोटात ७ जण ठार झाले असून १६ जण जखमी झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, हा स्फोट सरकार समर्थित शांतता समितीच्या कार्यालयाबाहेर झाला. हा स्फोट दक्षिण वझिरिस्तान जिल्ह्यातील मुख्य शहर वाना येथे झाला. हा भाग एकेकाळी पाकिस्तानी तालिबानचा बालेकिल्ला मानला जात होता.

स्थानिक पोलिस प्रमुख उस्मान वझिर यांच्या हवाल्याने असोशिएटेड प्रेसने दिलेल्या माहितीनुसार, हा बॉम्ब हल्ला शांतता समितीच्या कार्यालयाला लक्ष्य करत झाला, या समितीकडून उघडपणे तेहरिक-ए-तालिबान(टीटीपी)चा विरोध केला जातो. ही समिती स्थानिक पातळीवरील वाद सोडवण्याचेही काम करते. अधिकाऱ्यांनी हा स्फोट शक्तीशाली होता आणि यामुळे मोठ्या प्रमाणावर लोक जखमी होऊन मालमत्तांचे नुकसानही झाल्याची माहिती दिली.

या हल्ल्याची लगेचच कोणत्याही गटाने जबाबदारी घेतली नाही, मात्र टीटीपीने हा हल्ला केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. त्यांच्याकडूनच वारंवार सुरक्षा दल, नागरिक तसेच पाकिस्तानी सरकारबरोबर मिळून काम करणाऱ्या संस्थांना लक्ष्य केले जाते. पाकिस्तानी तालिबान ही वेगळी संघटना असूनही त्यांचे अफगाणिस्तानातील तालिबानशी संबंध आहेत.

५४ दहशतवादी ठार

पाकिस्तानच्या सैन्याने लागून असलेलया उत्तर वझिरीस्तान जिल्ह्यात एका कारवाईदरम्यान ५४ दहशतवाद्यांना ठार केल्याचे जाहीर केले होते, त्याच्या दुसर्‍याच दिवशी हा स्फोट झाला आहे. एपीने दिलेल्या वृत्तानुसार, हे दहशतवादी अफगाणिस्तानातून पाकिस्तानात प्रवेश करण्याचा प्रयत्न करत होते.

पाकिस्तानमधील इतर भागात देखील सुरक्षा परिस्थिती गंभीर आहे. बलुचिस्तान प्रांतातील एका घटनेत बलुचिस्तान लिबरेशन आर्मी (बीएलए) ने २५ एप्रिल रोजी झालेल्या रस्त्यावरील बॉम्ब हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. या हल्ल्यात दहा पाकिस्तानी लष्करी कर्मचारी ठार झाले होते आणि तीन जण जखमी झाले होते. या हल्ल्यात बीएलएने बॉम्ब निकामी करण्याच्या पथकाच्या वाहनाला लक्ष्य केले होते. दरम्यान या हल्ल्यात रिमोट-कंट्रोल्ड आयईडीचा वापर करण्यात आल्याचे बीएलएने म्हटले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पाकिस्तानला वेगवेगळ्या भागात बंडखोरांकडून हल्ले केले जात आहेत. ज्यामध्ये टीटीपी प्रामुख्याने खैबर पख्तूनख्वा आणि सीमावर्ती भागात हल्ले करत आहे तर दुसरीकडे बीएलएने बलुचिस्तानमध्ये अनेक प्राणघातक हल्ले केले आहेत.