वृत्तसंस्था, नवी दिल्ली/मुंबई
‘बॉम्बे’ (मुंबई) शहर हे पूर्वी गुजरातचा भाग होते. १९५६पर्यंत ते महाराष्ट्रात नव्हते, असे विधान भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी केल्यामुळे वाद निर्माण झाला आहे. त्यांच्या या विधानावर ठाकरे गटाने टीकेची झोड उठविली असून ‘समुद्रात बुडवून मारू’ या राज ठाकरेंच्या वक्तव्याचे समर्थनही केले आहे.
दुबे यांनी शुक्रवारी ‘एएनआय पॉडकास्ट’ला दिलेल्या मुलाखतीत हिंदी-मराठी वादावर गेल्या आठवड्यात केलेल्या विधानावर ठाम असल्याचे सांगितले. भाषावार प्रांतरचना झाली, त्यावेळी मुंबई ही गुजरातचा भाग होती. १९५६ साली महाराष्ट्र अस्तित्वात आल्यानंतर हे शहर राज्यात आले. असे असले तरी आता मुंबईत ३१ ते ३२ टक्केच मराठी माणसे असून तितकेच हिंदी भाषक नागरिक राहतात. मुंबईतील दोन टक्के लोक भोजपुरी बोलतात आणि १२ टक्के गुजराती आहेत, असा दावा दुबे यांनी या मुलाखतीत केला आहे. राज आणि उद्धव ठाकरेंवर टीका करताना ‘ते कुणी मोठे लाटसाहेब नाहीत,’ असेही ते म्हणाले. दुबे यांच्या या विधानावर शनिवारी ठाकरे गटाचे प्रवक्ता आनंद दुबे यांनी टिकेची झोड उठविली. देशाच्या विकासात मराठी माणसाचे योगदान नाही, असा दावा करून निशिकांत दुबे यांनीच वाद सुरू केल्याचे ते म्हणाले. ‘आपटून मारू’ या विधानाला राज ठाकरे यांनी प्रत्युत्तर दिल्याचे सांगत आनंद दुबे यांनी मनसे अध्यक्षांची बाजू उचलून धरली.