Donald Trump Trade Adviser: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ आकारल्यामुळे भारतीयांची नाराजी ओढवून घेतली असतानाच त्यांचे व्यापारविषयक सल्लागार पीटर नवारो आपल्या विधानांनी त्यात भर घालत आहेत. नवारो यांनी गेल्या काही दिवसांत भारत व भारतीयांबाबत टीकात्मक सूर लावला आहे. आता त्यांची मजल आणखी पुढे गेली असून त्यांनी भारताला रशियाचे ‘धुणीघर’ असे म्हटले आहे. शिवाय, सामान्य भारतीयांचं नुकसान करून तुम्ही ब्राह्मणांचा फायदा करून देत आहात, असंही विधान त्यांनी केलं असून त्यावरून उलट-सुलट चर्चा सुरू झाली आहे.

नेमकं काय म्हणाले Peter Navarro?

डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर आधी २५ टक्के आणि नंतर रशियाकडून कच्च्या तेलाची खरेदी करतो म्हणून अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ लागू केले आहे. यासंदर्भात भारतानं अधिकृत भूमिका अद्याप जाहीर केलेली नसताना पीटर नवारो मात्र एकामागून एक भारतविरोधी विधाने करत असल्यामुळे अमेरिका व भारत यांच्यातील संबंध दिवसेंदिवस कमालीचे तणावपूर्ण होताना दिसत आहेत. नवारो यांच्या ताज्या विधानाचीही त्यात भर पडली आहे.

नवारो यांनी फॉक्स न्यूजला दिलेल्या मुलाखतीमध्ये यासंदर्भात भूमिका मांडली आहे. भारतातील काही निवडक श्रीमंत व्यावसायिकांचाच आर्थिक फायदा करून दिला जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. “भारत म्हणजे क्रेमलिनसाठी (रशिया) फक्त धुणीघर आहे. भारतीयांचं नुकसान करून ब्राह्मणांचे खिसे भरताय. आपल्याला ते थांबवावं लागेल”, असं पीटर नवारो म्हणाले. भारत रशियाकडून कच्चं तेल आयात करत असून त्यावर प्रक्रिया करून ते प्रीमियम दर्जाचं म्हणून युरोपला विकत आहे, असंही नवारो म्हणाले आहेत.

“भारतानं रशियाकडून कच्चं तेल आयात केल्यामुळे त्या पैशातून आलेल्या शस्त्रास्त्रांनी युक्रेनच्या नागरिकांची हत्या केली जात आहे. आपण करदाते म्हणून काय करायला हवं? तर आपण त्यांना आणखी पैसे पाठवत आहात”, असं नवारो यांनी नमूद केलं.

“मोदी महान नेते आहेत, पण…”

दरम्यान, यावेळी पीटर नवारो यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींबाबतही भाष्य केलं. “पंतप्रधान नरेंद्र मोदी हे एक महान नेते आहेत. पण मला हे कळत नाहीये की भारत स्वत: जगातली सर्वात मोठी लोकशाही असताना ते व्लादिमीर पुतिन आणि शी जिनपिंग यांच्याशी मैत्रीसंबंध का ठेवत आहेत?”, असा प्रश्न नवारो यांनी उपस्थित केला आहे.

पंतप्रधान मोदी चीनमध्ये, पुतिन यांची गळाभेट!

दरम्यान, मोदी चीनमध्ये SCO परिषदेसाठी गेले असताना नवारो यांच्याकडून ही टिप्पणी करण्यात आली आहे. SCO परिषदेच्या निमित्ताने व्लादिमीर पुतिन व शी जिनपिंग यांची मोदींनी भेट घेतली. यावेळी पुतिन यांची गळाभेट घेतानाचे फोटो खुद्द मोदींनी शेअर केले आहेत. त्याशिवाय, शी जिनपिंग यांच्याशीही मोदींनी द्विपक्षीय संबंध सुधारण्यासाठीच्या विविध उपायांवर चर्चा केली. यानंतर जिनपिंग यांनी पंचशील तत्वांचा पुरस्कार होणं आणि त्यावर अंमलबजावणी होणं आवश्यक असल्याचं नमूद केलं.