गणपतीच्या प्रतिमेचा वापर करण्यात आलेली वादग्रस्त जाहिरात ब्राझिलच्या Jon Cotre कंपनीने अखेर हटवली आहे. या जाहिरातीत महिला आणि पुरुषांना गणपतीचे फोटो असलेले ‘शॉर्ट्स’ घालून दाखवण्यात आले होते.

ही जाहिरात झळकल्यापासून कंपनीचा विरोध सुरू झाला होता. ब्राझिलमधील भारतीयांनी कंपनीवर धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप करत जाहिरात तात्काळ मागे घेण्याची मागणी केली होती. वाढत्या विरोधानंतर अखेर आता कंपनीने ती जाहिरात हटवली आहे.

कंपनीच्या वेबसाइटवरुन वादग्रस्त जाहिरात हटवण्यात आली असून गणपतीचा फोटो असलेल्या शॉर्ट्सचं उत्पादनही थांबवण्यात आल्याची माहिती Jon Cotre कंपनीच्या साओ पाउलो येथील कार्यालयाकडून देण्यात आली. तसेच, कोणाच्याही धार्मिक भावना दुखावण्याचा किंवा अपमान करण्याचा आमचा हेतू नव्हता असं म्हणत कंपनीच्या प्रवक्त्यांकडून माफीही मागण्यात आली.

राजदूतांनी मांडला मुद्दा –
वादानंतर भारताचे ब्राझिलमधील राजदूत सुरेश रेड्डी यांनीही कंपनीसोबत संपर्क साधून मुद्दा संवेदनशील असल्याचं सांगितलं, त्यानंतर कंपनीने तातडीने पावलं उचलत जाहिरात थांबवली आणि सर्व दुकानांमधून गणपतीचे फोटो असलेल्या शॉर्ट्स परत मागवल्या. शिवाय कंपनीने त्या शॉर्ट्सचं उत्पादनही बंद केलं आहे.