ब्रिटनमध्ये आजपासून ऑक्सफर्ड-अस्त्राझेनेकाने विकसित केलेल्या करोना प्रतिबंधक लसीचे डोस देण्यास सुरुवात झाली आहे. ब्रायन पिंकर या ८२ वर्षीय निवृत्त मॅनेजरला चर्चिल रुग्णालयात ऑक्सफर्डच्या लसीचा डोस देण्यात आला. ही लस अत्यंत स्वस्तात उपलब्ध होणार आहे. या लसीमुळे करोनाची साथ संपुष्टात येईल असे तज्ज्ञांना वाटते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जगातील अनेक देशांमध्ये ही लस उपलब्ध होणार आहे. भारतात पुणे स्थित सीरम इन्स्टिट्यूट ऑक्सफर्डच्या लसीचे उत्पादन करत आहे. भारतात ‘कोव्हिशिल्ड’ असे या लसीचे नाव आहे. भारतात ऑक्सफर्ड-अस्त्राझेनेकाने विकसित केलेली लस आणि भारत बायोटेकच्या स्वदेशी कोव्हॅक्सीन लसीच्या मर्यादित आपत्कालीन वापरास सरकारने परवानगी दिली आहे.

लसी ११० टक्के सुरक्षित आहेत, परंतु त्यांच्या सुरक्षिततेबद्दल थोडीशी शंका निर्माण झाली तरी आम्ही त्यांना मंजुरी देणार नाही, असे औषध महानियंत्रक डॉ. व्ही. जी. सोमाणी यांनी स्पष्ट केले. कोव्हिशिल्ड ७०.४२ टक्के परिणामकारक, तर कोव्हॅक्सिन सुरक्षित असून उत्तम प्रतिकारशक्ती निर्माण करते, अशी पुष्टीही सोमानी यांनी जोडली.

औषध महानियंत्रकांनी करोना तज्ज्ञ समितीच्या अहवालाच्या आधारे दोन्ही लशींना आपत्कालीन वापराची परवानगी दिली असली तरी ‘कोव्हॅक्सिन’ला मंजुरी देताना मर्यादित वापरासाठी परवानगी देत असल्याचे म्हटले आहे. औषध महानियंत्रक डॉ. सोमाणी म्हणाले की सीरम आणि भारत बायोटेक यांच्या लशींना तज्ज्ञ समितीच्या अहवालाआधारे परवानगी देण्यात आली आहे. लशी दोन मात्रेत द्यायच्या असून त्या २ ते ८ अंश तापमानात साठवून ठेवता येतील.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Britains first oxford vaccine jab to brian pinker dmp
First published on: 04-01-2021 at 14:26 IST