लंडनचे हृदय समजला जाणारा शाही ‘बकिंगहम पॅलेस’ शहरातील सर्वाधिक प्रदूषित भागात आहे, असा निष्कर्ष ब्रिटनमधील पर्यावरण विभागाने काढला आहे. त्यामुळे ब्रिटनची महाराणी एलिझाबेथ हिलाही प्रदूषित भागात राहावे लागत आहे.
लंडनमधील सर्वच महत्त्वाचे रस्ते बकिंगहम पॅलेसजवळून जातात. या रस्त्यांवरून सतत वाहनांची वर्दळ सुरू असल्याने हा परिसर प्रदूषित झालेला आहे. वाहतुकीमुळे नायट्रोजन डायऑक्साइड (एनओटू) आणि अन्य विषारी वायूंचे सतत उत्सर्जन होत असल्याने त्याचा परिणाम बकिंगहम पॅलेसवर होत आहे. ब्रिटनच्या महाराणीलाच प्रदूषित भागात राहावे लागत असेल तर सर्वसामान्य जनतेचे काय, असा सवाल पर्यावरणप्रेमींनी विचारला आहे.
बकिंगहम पॅलेस हे पर्यटकांची लंडनमधील सर्वाधिक आकर्षण आहे. मात्र वाढत्या प्रदूषणामुळे येथील पर्यटकांची संख्या कमी होईल, अशी  भीती पर्यावरण विभागाने व्यक्त केली आहे.