UK man who ate chicken in ISKCON restaurant responds to backlash Watch Video : लंडनमधील इस्कॉनच्या गोविंदा या शाकाहारी रेस्टॉरंटमध्ये एक ब्रिटिश कंटेंट क्रिएटर केएफसी चिकन खात असल्याचा धक्कादायक व्हिडीओ काही दिवसांपूर्वी व्हायरल झाला होता. हा व्हिडीओ समोर आल्यानंतर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात संताप व्यक्त केला जात होता. आता या कंटेंट क्रिएटरने त्याच्या या कृतीबद्दल माफी मागितली आहे. याबरोबरच त्याने असे का केले? याबद्दल स्पष्टीकरण देखील दिले आहे.

या ब्रिटिश-आफ्रिकन युट्यूबरचे नाव सेन्झो असे असून त्याच्या चॅनलचे ६ हजार सबस्क्राइबर्स आहेत. दरम्यान सेन्झोन एक व्हिडीओ संदेश पोस्ट करत झालेल्या प्रकाराबाबत माफी मागितली आहे. तसेच त्याने आपण त्या भागातील व्हिगन रेस्टॉरंट्सना लक्ष्य करत होतो आणि प्रँक म्हणून तेथे जाऊन मांस खात होते, असेही त्याने स्पष्ट केले आहे

त्याने शेअर केलेल्या व्हिडीओ क्लिपमध्ये दिसून येत आहे की, तो इस्कॉन मंदिरात प्रवेश करत असताना काउंटरवरील एका व्यक्तीने तो मंदिरात जात असून गोविंदा रेस्टॉरंट हे त्याच्या विरूद्ध बाजूला असल्याबद्दल सांगितल्य़ाचं पाहायला मिळत आहे. त्यानंतर हा युट्यूबर माफी मागताना आणि बाहेर जाताना दिसत आहे. यानंतरच तो समोरच असलेल्या गोविंदा रेस्टॉरंटमध्ये जाऊन त्याचा व्हायरल झालेला प्रँक व्हिडीओ शूट करतो.

युट्यूबरचं नेमकं म्हणणं काय?

“जर मला माहिती असते की रेस्टॉरंट हे मंदिराशी संबंधित आहे, तर मी कोणत्याही परिस्थितीत प्रँक व्हिडीओ चित्रित केला नसता आणि निघून गेलो असतो,” असे तो त्याच्या व्हिडीओमध्ये म्हणाला आहे.

गोविंदा रेस्टॉरंटमध्ये चिकन खातानाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर युट्यूबरला मोठ्या प्रमाणात टीकेचा सामना करावा लागला होता. यानंतर आता त्याने स्पष्ट केले की, त्याने रेस्टॉरंटशी संपर्क साधला असून त्यांची माफी मागण्यासाठी तो तेथे पुन्हा एकदा जाणार आहे. “माझ्यासाठी एक विनोद असलेल्या गोष्टीमुळे त्यांना स्वत:ला सोशल मीडियावर पाहताना काय सहन करावे लागत असेल देवालाच माहित, पण खरंतर तो विनोद नव्हता,” असेही तो युट्यूबर त्याच्या व्हिडीओमध्ये म्हणाला.

“मी मर्यादा ओलांडली आणि हिंदू समुदायाशी संबंधित व्हिगन रेस्टॉरंटमध्ये चिकन खायला सुरूवात केली. माझे वर्तन हे अयोग्य आणि बेजबाबदार होते,” असेही तो त्याच्या व्हिडीओमध्ये म्हणतो. याबरोबरच त्याने व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर रेस्टॉरंटबद्दल आणि त्याच्याशी संबंधित हिंदू समुदायाबद्दल माहिती घेतली, असेही त्याने यावेळी नमूद केले.

“ते प्राणी आणि माणसांशी अहिंसा आणि शांततापूर्ण वर्तणावर विश्वास ठेवतात. माझे वर्तन समुदायाला अपमानास्पद वाटले आणि त्याबद्दल मी मनापासून आणि प्रामाणिकपणे माफी मागू इच्छितो,” असेही तो म्हणाला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान यापूर्वी हा युट्यूबर रेस्टॉरंटमध्ये जाऊन तेथे चिकन खातानाचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. यावरून सोशल मीडियावर प्रचंड संताप व्यक्त करण्यात आला होता इतकेच नाही तर त्याच्यावर कायदेशीर कारवाईची मागणी देखील अनेक जण करत होते.