कर्नाटक भाजप प्रदेशाध्यक्षपदी माजी मुख्यमंत्री बी.एस. येडियुराप्पा यांची निवड करण्यात आली आहे, तर उत्तर प्रदेशात इतर मागासवर्गीय समाजातील प्रमुख चेहरा अशी ओळख असलेल्या केशव प्रसाद मौर्य यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
कर्नाटकमध्ये लिंगायत समाजातील येडियुरप्पा यांच्यावर विश्वास टाकत भाजपने पुन्हा एकदा जुन्या व्यक्तीला संधी दिली आहे. भ्रष्टाचाराच्या आरोपांवरून येडियुरप्पांना राजीनामा द्यावा लागला होता. त्यानंतर पक्षातून काही काळ बाहेर पडत स्वत:चा पक्ष त्यांनी स्थापन केला होता. मात्र लोकसभा निवडणुकीपूर्वी ते पुन्हा भाजपमध्ये परतले. लोकसभेला ते शिमोगा मतदारसंघातून निवडून आले होते.
उत्तर प्रदेशच्या अध्यक्षपदी निवड झालेले मौर्य जुने संघ स्वयंसेवक आहेत. याखेरीज पंजाब प्रदेशाध्यक्षपदी केंद्रीय मंत्री विजय सांपला, तेलंगण प्रदेशाध्यक्षपदी आमदार के. लक्ष्मण व अरुणाचलच्या प्रदेशाध्यक्षपदी माजी खासदार तापीर गाओ यांची निवड करण्यात आली आहे.