कर्नाटकमध्ये बहुजन समाज पक्षाच्या सर्वेसर्वा मायावती या काँग्रेस- जनता दल सेक्यूलरच्या युतीच्या शिल्पकार ठरल्या आहेत. मायावती यांनी पुढाकार घेत सोनिया गांधी आणि जेडीएसचे प्रमुख एच डी देवेगौडा यांच्यात दुरध्वनीवरुन चर्चा घडवून आणल्याचे समोर आले आहे.

कर्नाटकमध्ये बहुजन समाज पक्ष आणि जनता दल सेक्यूलर या पक्षाची युती होती. बसपला कर्नाटकमध्ये पहिल्यांदाच एका जागेवर विजय मिळाला आहे. बसपने २० जागा लढवल्या होत्या. बसपला एकूण मतांपैकी ०.३ टक्के मते मिळाली आहेत. बसपची गेल्या निवडणुकीपेक्षा यंदाच्या निवडणुकीत मतांची टक्केवारी कमी झाली. पण पक्षाचा एक आमदार आल्याने बसपला दिलासा मिळाला. मायावती यांनी राज्यात चार सभा घेतल्या होत्या.

‘टाइम्स ऑफ इंडिया’च्या वृत्तानुसार मंगळवारी निकालाचे कल हाती येताच मायावती यांच्या आदेशानुसार त्यांचे निकटवर्तीय आणि राज्यसभेतील खासदार अशोक सिद्धार्थ यांनी काँग्रेस नेते गुलाम नवी आझाद यांची भेट घेतली. बहुमत नसल्याने सत्तास्थापन कशी करता येईल, याबाबत त्यांच्यात चर्चा झाली. यानंतर आझाद यांनी सोनिया गांधी यांच्याशी चर्चा केली. दुसरीकडे मायावतींनी एच डी देवेगौडा यांच्याशी चर्चा केली आणि त्यांना काँग्रेससोबत युती करण्यास राजी केले. देवेगौडा यांच्याशी चर्चा केल्यानंतर मायावतींनी सोनिया गांधींशी चर्चा केली आणि मग या युतीच्या निर्णयावर शिक्कामोर्तब झाले. यानंतर सोनिया गांधी व देवेगौडांनी चर्चा केली.