संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आज लोकसभेत राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावावर पंतप्रधान नरेंद्र मोदी उत्तर देतील. संध्याकाळी पंतप्रधान मोदींचे भाषण होण्याची शक्यता आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनाची सुरुवात राष्ट्रपती कोविंद यांनी ३१ जानेवारी रोजी लोकसभा आणि राज्यसभेच्या संयुक्त अधिवेशनाला केलेल्या अभिभाषणाने झाली. अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा पहिला भाग ३१ जानेवारी ते ११ फेब्रुवारी आणि दुसरा भाग १४ मार्च ते ८ एप्रिलपर्यंत चालणार आहे.

भाषणादरम्यान राष्ट्रपतींनी कोविड-१९ संकटाच्या काळात सरकारच्या कामगिरीचे कौतुक केले होते. करोनाचा सामना करण्यासाठी, शेतकरी आणि महिलांना मदत करण्यासाठी उचललेल्या पावलांचा त्यांनी विशेष उल्लेख केला. २०१४७ च्या स्वातंत्र्याच्या शतकापर्यंत आधुनिक भारताच्या उभारणीसाठी कठोर परिश्रम करण्याचे आवाहन त्यांनी केले.

राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावरील चर्चेला २ फेब्रुवारीपासून सुरुवात झाली. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या भागात दोन्ही सभागृहांनी यासाठी १२ तास घेतले. सत्ताधारी भाजपाच्या सदस्यांनी सरकारच्या कामगिरीचा गौरव केला, तर विरोधकांनी महागाई, बेरोजगारी यासह विविध बाबतीत अपयशी ठरल्याचा आरोप करत केंद्रावर हल्लाबोल केला.

यावेळी भाजपा खासदार हरीश द्विवेदी यांनी दावा केला की, उत्तर प्रदेशातील योगी आदित्यनाथ सरकारच्या काळात गेल्या पाच वर्षांत साडेचार लाख तरुणांना नोकऱ्या देण्यात आल्या आणि शेतकऱ्यांचे ३६,००० कोटी रुपयांचे कर्ज माफ करण्यात आले. केंद्र आणि उत्तर प्रदेशातील मागील सरकारे केवळ गरीब आणि मागासवर्गीयांच्या कल्याणासाठी काम करत नसल्याचा आरोप त्यांनी केला.

विरोधी पक्षाच्या वतीने सर्वप्रथम बोलताना काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी म्हणाले की, देशाला शहेनशाहाप्रमाणे चालवण्याचा प्रयत्न केला जात आहे. या सरकारच्या धोरणांमुळे आज देशाला अंतर्गत आणि बाह्य आघाड्यांवर मोठ्या संकटाचा सामना करावा लागत आहे, असा इशारा राहुल यांनी दिला. केंद्र सरकारच्या धोरणामुळेच आज चीन आणि पाकिस्तान एकत्र आल्याचा दावाही त्यांनी केला. नरेंद्र मोदी सरकारच्या काळात दोन भारत निर्माण झाले आहेत, एक श्रीमंतांसाठी आणि दुसरा गरीबांसाठी, असेही राहुल गांधी म्हणाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, खासदार असदुद्दीन ओवेसी यांच्या गाडीवर झालेल्या गोळीबाराच्या घटनेवर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज संसदेत निवेदन देणार आहेत. शाह सोमवारी सकाळी ११.३० च्या सुमारास लोकसभा आणि ४.३० वाजता राज्यसभेत बोलणार आहेत. मेरठमधील टोल प्लाझा येथे ओवेसी यांच्या गाडीवर तीन-चार राऊंड गोळीबार करण्यात आला. सुप्रसिद्ध गायिका लता मंगेशकर यांच्या स्मरणार्थ दोन्ही सभागृहांचे कामकाज तासभरासाठी तहकूब केले जाणार आहे.