आज संपूर्ण देशभरात स्वातंत्र्यदिनाचा अमृत महोत्सव साजरा केला जात आहे. जम्मू काश्मीरमध्येही मोठ्या उत्साहात स्वातंत्र्यदिन साजरा करण्यात आला. विशेष म्हणजे गेल्या तीन वर्षात पहिल्यांदाच जम्म काश्मीरमध्ये स्वातंत्र्यदिनाला इंटरनेट सेवा खंडीत झाली नाही. दरम्यान जम्मू काश्मीरमधील एका घटनेने सर्वांचंचं लक्ष वेधून घेतलं. भारतीय लष्कराच्या जवानांसोबत झालेल्या चकमकीत मारला गेलेला हिजबूल मुजाहिद्दीनचा दहशतवादी बुऱ्हान वानीच्या वडिलांनीही पुलवामा येथील एका शाळेत ध्वजारोहण केल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.

मुझफ्फर वानी हे शिक्षक असून त्राल येथील मुलींच्या उच्च माध्यमिक शाळेत त्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.

सुरक्षा जवानांसोबत झालेल्या चकमकीत जुलै २०१६ मध्ये बुऱ्हान वानी ठार झाला होता. यानंतर दक्षिण काश्मीमरमध्ये मोठ्या प्रमाणात अशांतता निर्माण झाली होती. त्याच्या अंत्यसंस्कारालाही मोठी गर्दी जमली होती. जवळपास पाच महिने सुरु असलेल्या आंदोलनात जवळपास १०० लोकांनी जीव गमावला तर हजारो जखमी झाले.

स्वातंत्र्यदिन अमृत महोत्सवाच्या निमित्ताने प्रशासनाने शिक्षण विभागासह सर्वांनाच आपापल्या परिसरात ध्वजारोहण करण्यास सांगितलं होतं.