पश्चिम बंगाल, ओडिशातील मतदारसंघांचा समावेश

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी या निवडणूक लढवणार असलेल्या राज्यातील भवानीपूर विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक ३० सप्टेंबर रोजी होणार असल्याची घोषणा निवडणूक आयोगाने शनिवारी केली. याशिवाय, ‘पुढे ढकललेल्या’ पश्चिम बंगालमधील २ आणि ओडिशातील एक अशा तीन विधानसभा मतदारसंघांसाठीही याच दिवशी पोटनिवडणूक होणार आहे.

पश्चिम बंगालमधील समशेरगंज व जांगीरपूर आणि ओडिशातील पिपली या मतदारसंघांतील निवडणुका या वर्षीच्या सुरुवातीला एका उमेदवाराच्या मृत्यूसह इतर कारणांमुळे होऊ शकल्या नव्हत्या.

या चारही मतदारसंघांतील मतमोजणी ३ ऑक्टोबरला होईल. करोना महासाथीपासून बचावासाठी खबरदारी म्हणून निवडणूक आयोगाने या वेळी ‘अधिक कठोर’ निकष लागू केले आहेत. भवानीपूर पोटनिवडणुकीमुळे ममता बॅनर्जी यांना राज्य विधानसभेच्या सदस्य होण्याची संधी मिळू शकेल.

या वर्षीच्या सुरुवातीला झालेल्या प. बंगाल विधानसभा निवडणुकांत बॅनर्जी या कोलकात्यातील भवानीपूर हा त्यांचा पारंपरिक मतदारसंघ सोडून नंदीग्राम येथून लढण्यासाठी गेल्या होत्या. मात्र तेथून भाजपच्या तिकिटावर लढणारे त्यांचे पूर्वाश्रमीचे जवळचे सहकारी शुभेंदु अधिकारी यांच्याकडून त्या पराभूत झाल्या होत्या.  निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर, भवानीपूर मतदारसंघातील तृणमूल काँग्रेसचे आमदार शोभनदेव चट्टोपाध्याय यांनी बॅनर्जी यांना तेथून लढता यावे यासाठी राजीनामा दिला होता.