गोवा येथील दोन मतदारसंघांमध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपने बाजी मारली.पणजीतून निवडणूक लढवणारे गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर आणि वालपोई मतदार संघात भाजपचे विश्वजित राणे हे विजयी झाले. राणेंनी १० हजार मतांनी काँग्रेसच्या रॉय नाईक यांचा पराभव केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

तीन राज्यांमधील विधानसभेतील चार जागांसाठी पोटनिवडणूक पार पडली. गोव्यातील पणजी, वालपोई,  दिल्लीतील बवाना आणि आंध्रप्रदेशमधील नंद्याल या चार जागांसाठी पोटनिवडणूक झाली. सोमवारी कडेकोट बंदोबस्तात मतमोजणीला सुरुवात झाली. गोव्यातील पोटनिवडणुकीकडे देशभराचे लक्ष लागले होते. पणजीमध्ये मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर निवडणूक लढवत असून त्यांना काँग्रेसचे गिरीश चोडणकर आणि गोवा सुरक्षा मंचचे आनंद शिरोडकर यांनी आव्हान दिले होते. या निवडणुकीत पर्रिकर यांनी चोडणकर यांचा सुमारे ४,८०० मतांनी पराभव केला. पर्रिकर यांच्या विजयामुळे भाजपला दिलासा मिळाला आहे. पणजी हा मनोहर पर्रिकर यांचा बालेकिल्ला मानला जातो. पणजीत ७० टक्के मतदान झाले होते. या भागातील मतदार भाजपवर नाराज असल्याची चर्चा होती. मात्र प्रत्यक्षात मतदारांनी भाजपच्या बाजूने कौल दिल्याचे मतमोजणीतून स्पष्ट झाले.

वालपोईमध्ये आरोग्यमंत्री आणि भाजप उमेदवार विश्वजित राणे हे रिंगणात होते. राणे यांना काँग्रेसच्या रॉय नाईक यांनी आव्हान दिले होते. वालपोईत ७९.८० टक्के मतदान झाले होते. या निवडणुकीत विश्वजित राणे विजयी झाले.त्यांनी काँग्रेस उमेदवाराचा तब्बल १० हजार मतांनी पराभव केला.

दिल्लीतील बवाना येथे आप, भाजप आणि काँग्रेस या पक्षांमध्ये लढत होती. महापालिका निवडणुकीतील पराभवानंतर ‘आप’साठी ही निवडणूक महत्त्वाची मानली जात होती. ‘आप’चे रामचंदर हे २४ हजार मतांनी विजयी झाले. या निवडणुकीत राम चंदर यांना ५९, ८८६ मते मिळाली. तर भाजपच्या वेद प्रकाश यांना ३५, ८३४ आणि काँग्रेसच्या सुरेंदर कुमार यांना ३१, ९१९ मते मिळाली.

आंध्रप्रदेशमधील नंद्याल येथे सत्ताधारी तेलगू देसम पक्ष आणि वायएसआर काँग्रेस यांच्यात लढत आहे. पोटनिवडणुकीत या मतदारसंघात तब्बल ७९. १३ टक्के मतदान झाले होते. या निवडणुकीत तेलगू देसमच्या उमेदवाराने बाजी मारली.

UPDATES:

०३:२५: तेलगू देसम पक्षाचे बी. ब्रह्मानंद रेड्डी यांनी नंदयालमधील पोटनिवडणुकीत बाजी मारली. त्यांनी वायएसआर काँग्रेसच्या एस मोहन रेड्डी यांचा पराभव केला.

०१:०२: दिल्लीतील बवानामध्ये आपचा विजय, राम चंदर यांचा २३ हजार १३२ मतांनी विजय, भाजप तिसऱ्या स्थानी

११:२७: दिल्लीत आपचे रामचंदर १० हजार मतांनी आघाडीवर
AAP’s Ram Chander takes lead of 10,917 votes over Cong’s Surender Kumar in 16th round of counting, BJP’s Ved at 3rd position

०९:४७: बवाना येथे काँग्रेस उमेदवार सुरेंदर कुमार आघाडीवर, लागोपाठ तिसऱ्या निवडणुकीत ‘आप’चा पराभव होण्याची शक्यता

०९:४३: पुढील आठवड्यात राज्यसभेतील खासदारकीचा राजीनामा देणार: मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर

०९:४२: आंध्रप्रदेशमधील नंद्यालमध्ये तिसऱ्या फेरीतील मतमोजणी पूर्ण. तेलगू देसमचे बी. बी. रेड्डी आघाडीवर, रेड्डी यांच्या पारड्यात १७ हजार ६९५ मते पडली असून वायएसआर काँग्रेसच्या उमेदवाराला ११, ६२४ मते मिळाली. काँग्रेसला फक्त १४२ मते मिळाली.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bypoll results live updates counting begins goa panaji valpoi cm manohar parrikar vishwajit rane bjp congress delhi nandyal
First published on: 28-08-2017 at 09:29 IST