लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजप यांच्या विचारांची घट्ट बांधणी असलेले मितभाषी आणि वादातीत व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जाणारे चंद्रपुरम पोन्नुसामी राधाकृष्णन यांची भारताचे १५ वे उपराष्ट्रपतीपदी निवड झाली. देशातील दुसऱ्या क्रमांकाचे घटनात्मक पद भूषवणारे सी. पी. राधाकृष्णन हे तमिळनाडूतील तिसरे नेते आहेत. १९९८मध्ये अटलबिहारी वाजपेयी यांच्या सरकारमध्ये केंद्रीय मंत्रीपद पटकावण्याची राधाकृष्णन यांची संधी केवळ नामसाधर्म्यामुळे हुकली आणि त्यांच्या नावाची चर्चा असताना तमिळनाडूचेच पोन राधाकृष्णन केंद्रीय मंत्री बनले. मात्र, त्यानंतर भाजपमधील विविध पदे आणि झारखंड तसेच महाराष्ट्राचे राज्यपालपद भूषवणारे राधाकृष्णन यांनी थेट उपराष्ट्रपती पदावर झेप घेतली आहे.

तमिळनाडूतील तिरूपूर येथे २० ऑक्टोबर १९५७मध्ये जन्मलेले राधाकृष्णन यांनी वयाच्या १६व्या वर्षी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेत प्रवेश केला आणि पुढच्याच वर्षी, १९७४मध्ये भारतीय जनसंघाचे ते राज्य कार्यकारी समितीचे सदस्य बनले. पक्षांतर्गत वर्तुळात ‘पचई तमिळन’ (खरा तमिळ) म्हणून ओळखले जाणारे राधाकृष्णन राज्यातील आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या प्रबळ मानल्या जाणाऱ्या कोंगु वेल्लार गौंडुर समुदायातील आहेत. आपल्या मितभाषी आणि वादापासून दूर राहण्याच्या स्वभावामुळे राज्य संघटनेत त्यांनी पकड मिळवली आणि १९९६मध्ये राज्य भाजपचे सचिव बनले.

२००३ ते २००६ मध्ये राधकृष्णन राज्याचे प्रदेशाध्यक्षपदही सांभाळले. या काळात त्यांनी ९३ दिवसांची रथयात्रा काढून पक्षश्रेष्ठींचे लक्ष वेधून घेतले. भारतीय नद्यांची जोडणी करण्याचा आग्रह हा त्यांच्या रथयात्रेमागील एक हेतू होता. १९९८मध्ये केवळ नावातील घोळामुळे केंद्रीय मंत्रीपद हुकलेल्या राधाकृष्णन यांनी महाराष्ट्राचे राज्यपालपद भूषवण्याआधी झारखंडमध्येही दीड वर्ष ही जबाबदारी सांभाळली होती. त्याच काळात झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना राजभवन येथून अटक करण्यात आली होती.