नवी दिल्ली : आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये महिलांप्रमाणे तरुणही निर्णायक मतदार असल्याने केंद्र सरकारने आता युवाशक्तीकडे लक्ष देण्यास सुरुवात केली आहे. तरुणांच्या विकासासाठी केंद्राची युवा डिजिटल शाखा उघडली जाणार असून तिचे ‘माय भारत’ असे नामकरण करण्यात आले आहे. या डिजिटल संस्थेच्या प्रस्तावाला बुधवारी केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली.

मेरा युवा भारत (माय भारत) ही नवी डिजिटल संस्था देशातील तरुणांच्या नेतृत्वक्षमतांचा व कौशल्यांचा विकास करण्यासाठी उभारली जात असून सरदार पटेल यांच्या जयंतीला, ३१ ऑक्टोबरला त्याचे लोकार्पण होणार असल्याची माहिती केंद्रीय माहिती व प्रसारणमंत्री अनुराग ठाकूर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

हेही वाचा >>> जगात ‘वसुधैव कुटुंबकम्’चे महत्त्व अधोरेखित; संयुक्त राष्ट्रांमध्ये विनय सहस्रबुद्धे यांचे भाषण

तरुणांच्या सर्वांगीण विकासासाठी ‘नेहरू युवा केंद्र संघटना’ नावाची संस्था आहे. त्याचा कारभार केंद्रीय युवा व क्रीडा मंत्रालयाच्या अखत्यारीत चालवला जातो. आता त्याच धर्तीवर केंद्र सरकार दुसरी संस्था निर्माण करत आहे. ‘एनवायसी’सारखी संस्था अस्तित्वात असली तरी तरुणांसाठी नवी संस्था स्थापन करण्यात गैर नाही, असे ठाकूर यांनी सांगितले. ‘मेरा भारत’ ही संस्थाही केंद्रीय युवा व क्रीडा मंत्रालयाच्या अखत्यारीत काम करेल. ‘मेरा भारत’ या संस्थेचे मुख्य उद्दिष्ट तरुणांच्या विकासासाठी अत्याधुनिक डिजिटल व्यासपीठ उपलब्ध करून देणे असून देशात १५ ते १९ या वयोगटातील सुमारे ४० कोटी तरुणांना ‘मेरा भारत’ या संस्थेचा लाभ होईल, असा दावा ठाकूर यांनी केला.

मेरा भारतचे प्रयोजन

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तरुणांना विकासाच्या विविध संधी उपलब्ध असू शकतात पण, त्याची एकत्रित माहिती मिळण्याची सुविधा नाही, ती ‘मेरा भारत’द्वारे मिळू शकेल. शैक्षणिक, आरोग्य, क्रीडा अशा विविध क्षेत्रांमध्ये उज्ज्वल भविष्य निर्माण करण्यासाठी ही संस्था माध्यम असेल. सरकारच्या वेगवेगळय़ा योजनांची माहिती मिळू शकेल. कौशल्य विकासाच्या कार्यक्रमांमध्ये तरुणांना सहभागी होता येईल. ही संस्था केंद्र सरकारकडून कार्यान्वित होणार असली तरी, त्यासाठी केंद्राने अर्थसाह्य दिलेले नाही. तरुणांनी स्वयंप्रेरणेने या संस्थेच्या कारभारामध्ये सहभागी होणे व त्याचा अधिकाधिक लाभ घेणे अपेक्षित आहे. – अनुराग ठाकूर,  केंद्रीय माहिती व प्रसारणमंत्री