झारखंडमधील राष्ट्रपती राजवट उठवण्याची शिफारस केंद्राने केल्याने आता तिथे हेमंत सोरेन यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापनेचा मार्ग मोकळा झाला आहे.
झारखंडचे राज्यपाल सय्यद अहमद यांनी केंद्राकडे राष्ट्रपती राजवट उठवण्याची शिफारस केली होती. त्याला केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आल्याचे माहिती आणि प्रसारणमंत्री मनीष तिवारी यांनी सांगितले. झारखंड मुक्ती मोर्चाने भाजप सरकारचा पाठिंबा काढून घेतल्यानंतर १८ जानेवारीपासून राज्यात राष्ट्रपती राजवट आहे. झारखंड मुक्ती मोर्चाचे विधिमंडळ पक्ष नेते हेमंत सोरेन यांनी मंगळवारी पाठिंबा देणाऱ्या आमदारांची यादी राज्यपालांकडे सोपवून सरकार स्थापन करण्याची इच्छा व्यक्त केली. सोरेन यांना काँग्रेस, राष्ट्रीय जनता दल आणि छोटय़ा पक्षांचा पाठिंबा आहे. ८२ सदस्य असलेल्या झारखंड विधानसभेत सोरेन यांनी ४३ जणांच्या पाठिंब्याचा दावा केला आहे.