पार्सल सेवेचा क्षमतेपेक्षा कमी वापर केल्याने रेल्वेला ३१४ कोटी रुपयांचा फटका बसला  असल्याचे ताशेरे मुख्य महालेखापरीक्षक व नियंत्रकांनी (कॅग) मारले आहेत. पार्सल कार्गो एक्सप्रेस ट्रेन ही रेल्वेची मालवाहू सेवा आहे व त्यात रेल्वेला हा तोटा झाला असल्याचा ठपका रेल्वे महामंडळावर ठेवण्यात आला आहे. रेल्वे महामंडळ व मालवाहतूक अंमलबजावणी सेवा यांच्यात समन्वय नसल्याचा हा परिणाम असल्याचे कॅगने म्हटले आहे.
रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी फेब्रुवारी २००७ मध्ये खासगी ऑपरेटर्सच्या माध्यमातून घरोघरी माल पोहोचवण्याची योजना आखली होती. तसे धोरणही तयार करण्यात आले होते. पार्सल ट्रेन (रेल्वेगाडय़ा) भाडेपट्टयाने देण्याचेही ठरवण्यात आले होते.
कॅगने म्हटले आहे की, दक्षिण रेल्वेला यात ठराविक मार्ग व वेळापत्रक ठरवून काम करता आले नाही. त्यामुळे चार मार्गावर पीसीइटी (पार्सल कार्गो एक्सप्रेस ट्रेन्स) ही मालवाहू सेवा सुरूच न झाल्याने ३१४.६४ कोटी रुपयांचा फटका बसला आहे.
कॅगने रेल्वे मंडळाकडच्या सगळ्या नोंदी पाहूनच हा निष्कर्ष काढला आहे व दक्षिण रेल्वेला ही सेवा देण्यात ज्या अडचणी होत्या त्या रेल्वे मंडळाला कळवण्यात आल्या नाहीत.
दक्षिण रेल्वे प्रशासनाने इतर विभागीय रेल्वे मंडळांशी ही सेवा चालवण्याबाबत संपर्क ठेवला नाही, असे कॅगच्या अहवालात म्हटले आहे. रेल्वेकडे वजन करण्याची व्यवस्था ७०० भार केंद्रांच्या ठिकाणी हवी होती. ती नसल्याने कोळसा, लोहखनिज यांच्या वाहतुकीत तोटा झाला. ११७६ पैकी ७५९ ठिकाणी वजनकाटे नाहीत. त्यामुळे खासगी वजनकाटय़ांवर वजन केले गेले असे संसदेला सादर केलेल्या अहवालात म्हटले आहे.