राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा स्वयंसेवक असल्याचा अर्जामध्ये उल्लेख केलेल्या, केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री स्मृती इराणी यांना केंद्रात मंत्रिपद मिळाल्यावर त्यांचे अभिनंदन करणाऱया आणि नागपूरमधील दौऱयावेळी काही वेळासाठी तुम्ही आपल्याच घरामध्ये थांबला होतात, याची त्यांना आठवण करून देणाऱया विश्राम जामदार यांची नागपूरमधील ‘विश्वेश्वरय्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी’च्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. या पदावर नियुक्ती करण्यासाठी मनुष्यबळ विकास मंत्रालयाने एकूण चार जणांची नावे सुचविली होती. ती सर्व बाजूला ठेवत केवळ जामदार यांचेच नाव राष्ट्रपती कार्यालयाकडे पाठविण्यात आले. त्याला १५ सप्टेंबर रोजी मंजुरी देण्यात आली. स्मृती इराणी यांच्याकडून करण्यात आलेली ही नियुक्ती वादाच्या भोवऱयात अडकण्याची शक्यता आहे. ‘द इंडियन एक्स्प्रेस’ने यासंदर्भातील वृत्त दिले आहे.
स्मृती इराणी यांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यावर दोन दिवसांनी २८ मे रोजी जामदार यांनी त्यांना पत्र लिहिले होते. त्यामध्ये त्यांनी स्मृती इराणी यांचे तोंडभरून कौतुक केले होते. आपल्याला आणि आपल्या कुटुंबाला तुमचे व्यक्तिमत्त्व एकमेवाद्वितीय असल्याचे वाटते. तुमच्या नेतृत्त्वाखाली मनुष्यबळ विकास मंत्रालय नव्या उंचीवर जाईल, असे या पत्रामध्ये लिहिण्यात आले होते. त्याचबरोबर नागपूरमधील दौऱय़ावेळी तुम्ही आमच्याच घरामध्ये काहीवेळासाठी थांबला होतात, याचीही आठवण जामदार यांनी पत्रामध्ये करून दिली होती. या पत्रासोबतच केलेल्या अर्जामध्ये त्यांनी व्हीएनआयटीचे अध्यक्षपदी आपली नियुक्ती करण्याची विनंतीही केली होती.
अर्जामध्ये त्यांनी आपण संघाचे स्वंयसेवक असल्याचा उल्लेख केला होता. त्याचबरोबर केंद्रात अर्जुनसिंग मनुष्यबळ विकासमंत्री असतानासुद्धा उत्तम कामामुळेच मला व्हीएनआयटीच्या संचालक मंडळावर कायम ठेवण्यात आले होते, असेही त्यांनी अर्जामध्ये म्हटले आहे.
व्हीएनआयटीच्या सध्याच्या अध्यक्षांची मुदत मे २०१४ मध्येच संपुष्टात येत असल्याची आठवण करून देत त्यांनी आपली अध्यक्षपदी नियुक्ती करण्याची मागणी अर्जामध्ये केली होती. अध्यक्षपदी नियुक्ती केल्यास आपण मनापासून आणि प्रामाणिकपणे काम करून संस्थेचा विकास करू, असेही त्यांनी पत्रामध्ये म्हटले होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Calling himself rss person weeks later is made chief of nagpur nit
First published on: 07-11-2014 at 12:16 IST