Benjamin Netanyahu Advice to PM Modi: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर ५० टक्के आयातशुल्क लादला असून यामुळे दोन्ही देशांच्या व्यापारी संबंधात तणाव निर्माण झाला आहे. जगभरात याचीच चर्चा होत आहे. टॅरिफ वाढविताना ट्रम्प यांनी रशियाकडून खनिज तेल आयात करणे बंद करावे, असा दबावही भारतावर टाकला आहे. या परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी भारताकडून प्रयत्न सुरू आहेत. अशातच आता भारताचा मित्र देश असलेल्या इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यानाहू यांनीही मोठी प्रतिक्रिया दिली आहे.
इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यानाहू म्हणाले, “भारत आणि अमेरिका हे एकमेकांचे चांगले मित्र आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांना कसे हाताळावे. याबद्दल मी पंतप्रधान मोदींना काही सल्ला देऊ शकतो. पण खासगीत.” द इंडियन एक्सप्रेसने यासंबंधीचे वृत्त दिले आहे.
नेत्यानाहू पुढे म्हणाले, भारत आणि अमेरिका यांच्यातील संबंधात समंजसपणा आहे. या दोन्ही देशांच्या संबंधाचा पाया भक्कम आहे. भारत आणि अमेरिकेने एका मतावर येऊन आयातशुल्काचा प्रश्न सोडवणे हिताचे ठरू शकते. असा काही ठराव झाल्यास तो इस्रायलसाठीही महत्त्वाचा असेल कारण दोन्ही देश एकमेकांचे मित्र आहेत.
भारतीय पत्रकारांनी इस्रायलला भेट दिली असता त्यांच्याशी ४५ मिनिटे अनौपचारिक गप्पा मारताना नेत्यानाहू यांनी डोनाल्ड ट्रम्प यांचा टॅरिफचा निर्णय ते जागतिक घडामोडींवर भाष्य केले. तसेच ऑपरेशन सिंदूर दरम्यान इस्रायलने भारताला लष्करी उपकरणे पुरविल्याचेही ते म्हणाले. या सर्व उपकरणांनी आपले काम चोख बजावले, असेही त्यांनी सांगितले.
गाझा ताब्यात घेणार का?
गाझामध्ये चालू असलेल्या संघर्षावरही नेत्यानाहू यांनी टिप्पणी केली. ते म्हणाले, “गाझा ताब्यात घेणे किंवा तो भाग सामील करण्याची आमची योजना नाही. आम्हाला फक्त हमासला नेस्तनाबूत करत बंदी बनवलेले आमचे लोक परत आणायचे आहेत. त्यानंतर गाझाचा ताबा तात्पुरत्या सरकारकडे सोपवला जाईल. पण तो भाग पॅलेस्टिनी प्राधिकरण किंवा हमासच्या ताब्यात जाऊ देणार नाही, हे मात्र नक्की.”
आम्हाला युद्ध संपवायचे आहे, ते लवकर संपेल यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. जर हमासने शस्त्र खाली टाकली आणि ओलिसांना मुक्त केले तर हा संघर्ष उद्याही थांबेल. एवढेच नाही तर पॅलेस्टिनीही हमासविरोधात लढत आहेत, असेही बेंजामिन नेत्यानाहू म्हणाले.
भारताशी इस्रायलची अतूट मैत्री
भारत आणि इस्रायलच्या संबंधाबद्दल बोलताना नेत्यानाहू म्हणाले, “आमचे भारताबरोबर अतिशय चांगले संबंध आहेत. मी हे अगदी मनापासून सांगत आहे. भविष्यात आणखी संधी विकसित करता याव्यात, असा आमचा प्रयत्न आहे. पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली भारताने त्यांचे तथाकथित तटस्थ राहण्याचे धोरण बदलले आहे. भारत आणि इस्रायल आता एक चांगली मैत्री अनुभवत आहेत.”