Honour Killing : पाकिस्तानातील बलुचिस्तानमधला ‘ऑनर किलिंग’च्या घटनेचा धक्कादायक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत अनैतिक संबध असल्याच्या आरोपातून एका जोडप्याची भर दिवसा हत्या केली जात असल्याचे दिसून येत आहे. आता या घटनेच्या संदर्भात महिलेचे शेवटचे शब्द काय होते ती माहितीही समोर आली आहे.
नेमकं काय घडलं?
व्हिडीओ समोर आल्यानंतर पाकिस्तानात गदारोळ झाला आहे. तिथल्या मानवाधिकार कार्यकर्त्यांनी या घटनेचा निषेध नोंदवला आहे. तसंच ऑनर किंलिंगचे प्रकार थाबवण्याची मागणी केली आहे. अशा प्रकरणांत कुटुंबांकडूनच महिलांची हत्या केली जाते. ही बाब निषेधार्ह आहे असंही या कार्यकर्त्यांनी म्हटलं आहे. ज्या महिला प्रथा आणि परंपरा पाळत नाहीत किंवा आपल्या मर्जीने लग्न करण्याचा किंवा एखाद्या व्यक्तीसह राहण्याचा निर्णय घेतात त्यांना अशा प्रकारे ठार केलं जातं ही बाब निषेधार्ह आहे. दरम्यान या प्रकरणात मुलीचे शेवटचे शब्द काय होते? हेदेखील आता समोर आलं आहे.
काय होते त्या मुलीचे शेवटचे शब्द?
हत्या करण्याआधी ती मुलगी म्हणाली माझ्याबरोबर चल तू सात पावलं चाल, त्यानंतर तू मला गोळ्या घालू शकतोस.स्थानिक भाषेत ही मुलगी हे म्हणाल्याचं तिथल्या स्थानिक पोलिसांनी म्हटलं आहे. एनडीटीव्हीने या विषयीचं वृत्त दिलं आहे. यानंतर या व्हिडीओत हे दिसतं आहे की एक माणूस या मुलीच्या मागे जातो आणि बंदूक काढून तिच्यावर तीन गोळ्या झाडतो. त्यानंतर तो या महिलेच्या पतीलाही ठार करतो. त्यानंतर आणखी एक माणूस तिथे येतो आणि तोदेखील या दोघांवर गोळीबार करतो. यानंतर रक्ताच्या थारोळ्यात असलेले दोघांचे मृतदेह दिसतात. असा हा व्हिडीओ आहे.
पोलिसांनी काय सांगितलं?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ज्यांची हत्या करण्यात आली त्या दोघांची नावं बानो बीबी आणि अहसान उल्लाह अशी आहेत. पोलिसांनी कासी संशयितांची नावंही सांगितली आहेत. पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी सुरु केली आहे. दरम्यान या प्रकरणात या दोघांच्याही कुटुंबातला एकही सदस्य समोर आलेला नाही.
ऑनर किलिंग प्रकरणात ११ जणांना अटक
ही घटना ईद अल-अजहाच्या तीन दिवस आधी घडल्याचे सांगितले जात आहे, ही घटना उजेडात आल्यानंतर संपूर्ण पाकिस्तानातून संताप व्यक्त केला जात आहे. सिव्हील सोसायटी ग्रुप्स, धार्मिक नेते आणि राजकीय नेत्यांनी देखील या हत्येचा निषेध केला आहे, तसेच या घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा मिळावी अशी मागणी केली आहे. बलुचिस्तानचे मुख्यमंत्री सरफाराज बुगती यांनी सोमवारी या गुन्ह्यात सहभागी ११ लोकांना अटक केल्याची माहिती दिली आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर क्वेट्टाच्या हन्ना-उराक पोलीस ठाण्यात स्टेशन हाऊस ऑफिसर नावीद अख्तर यांनी एफआयआर नोंदवला आहे.