कॅनडामधील मिसिसोंगा येथील एका एका हिंदू मंदिराची तोडफोड करून त्यावर भारतविरोधी घोषणा लिहिल्याची घटना समोर आली आहे. मिसिसोंगा येथील राम मंदिरात मंगळवारी ही घटना घडली. या घटनेनंतर टोरंटो येथील भारताच्या वाणिज्य दूतावासाने या घटनेचा निषेध नोंदवला आहे. तसेच दूतावासाने या प्रकरणातील गुन्हेगारांना कठोर शिक्षा देण्याची मागणी केली आहे.

भारताच्या वाणिज्य दूतावासाने याप्रकरणी एक निवेदन जारी केलं आहे. त्यात त्यांनी लिहिलं आहे की, “आम्ही मिसिसोंगामधील राम मंदिराची तोडफोड करणे आणि मंदिरावर भारतविरोधी घोषणा लिहिणाऱ्यांचा निषेध करतो. आम्ही कॅनडा सरकारकडे या प्रकरणाचा तपास करण्याची आणि आरोपींविरोधात कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे.”

वर्षभरातली चौथी घटना

कॅनडामध्ये हिंदू मंदिराला लक्ष्य करण्याची ही पहिलीच घटना नाही. याआधी जानेवारीमध्ये कॅनेडातल्या ब्राम्प्टन येथील हिंदू मंदिरावर भारतविरोधी घोषणा लिहिण्याची घटना घडली होती. त्यानंतर तिथल्या स्थानिक हिंदू रहिवाशांनी नाराजी व्यक्त केली होती. तसेच भारताच्या वाणिज्य दूतावासाने याप्रकरणी नाराजी व्यक्त करताना म्हटले होते की, “ब्राम्प्टन येथील गौरी शंकर मंदिराच्या विद्रुपीकरणामुळे कॅनडामध्ये राहणाऱ्या हिंदू समाजाच्या भावना दुखावल्या आहेत. त्यानंतर भारतीय दूतावासाने कॅनडा सरकारसमोर या प्रकरणाचा तपास करण्याची मागणी केली होती.”

महापौरांकडून निषेध

ब्राम्प्टनचे महापौर पॅट्रिक ब्राऊन यांनी देखील या घटनेचा निषेध नोंदवला होती. पॅट्रिक ब्राऊन म्हणाले होते की, अशा घृणास्पद कृत्यांना आपल्या शहरात आणि देशात स्थान नाही. तसेच महापौर ब्राऊन यांनी शहर पोलीस प्रमुखांशी चर्चा करून या घटनेची चौकशी केली होती.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हे ही वाचा >> भाजपाने राज्यातल्या उद्योगांपाठोपाठ ज्योतिर्लिंगही पळवलं? आसामच्या मुख्यमंत्र्यांच्या जाहिरातीमुळे वाद पेटला

महात्मा गांधींच्या मूर्तीची तोडफोड

सप्टेंबर २०२२ मध्ये कॅनडामधील स्वामीनारायण मंदिरात तोडफोड केल्याची घटना समोर आली होती. या सर्व घटनांमध्ये खलिस्तान समर्थकांवर आरोप होत आहे. जुलै २०२२ मध्ये देखील ग्रेटर टोरंटो परिसरातल्या रिचमंड हिल येथील हिंदू मंदिरातील महात्मा गांधीची मूर्ती फोडण्यात आली होती.