इंग्लंडचे पंतप्रधान बोरीस जॉन्सन यांचा नियोजित दौरा रद्द करावा. तसेच इंग्लंडच्या विमानांवर तातडीने बंदी घालावी. तिथून जे प्रवासी आले असतील त्यांना क्वारंटाइन केलं आहे अशी मागणी आता काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे. इंग्लंडमध्ये करोना व्हायरसचा नवा प्रकार समोर आला आहे. तिथली परिस्थिती हाताबाहेर गेली आहे असं खुद्द बोरीस जॉन्सन यांनीच सांगितलं आहे. अशा परिस्थितीत कोणतीही हयगय न करता तातडीने तिथल्या विमानांवर बंदी घालावी. तसंच बोरीस जॉन्सन यांना प्रजासत्ताक दिनी जे निमंत्रण दिलं आहे तेपण रद्द करावं असंही त्यांनी म्हटलं आहे.

आणखी वाचा- ‘चिंता करण्याची आवश्यकता नाही’, करोनाच्या नव्या स्ट्रेनच्या पार्श्वभूमीवर आरोग्यमंत्र्यांचे विधान

इंग्लंडमध्ये करोनाचा व्हायसरचा नवा प्रकार समोर आला आहे. त्यामुळे तिथे करोनाचा धोका वाढला आहे. लंडनमधून तर प्रत्येकजण बाहेर पडण्याचा प्रयत्न करतो आहे. करोना व्हायरसचा नवा प्रकार या ठिकाणी समोर आला आहे. लंडनमध्ये  पुन्हा एकदा लॉकडाउन सुरु केला आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी बोरीस जॉन्सन यांचा दौरा रद्द करावा अशी मागणी केली आहे. आज याबाबत पंतप्रधान कार्यालयाची एक बैठक होणार आहे. मात्र यावर बैठक वगैरे न घेता तातडीने निर्णय घेण्यात यावा आणि इंग्लंडहून भारतात येणाऱ्या विमानांवर बंदी घालावी अशी आग्रही मागणी पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे. इतकंच नाही तर त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या धोरणांवरही टीका केली आहे. त्यांनी लॉकडाउन करण्यासाठी उशीर केला त्यामुळेच महाराष्ट्रात करोना पसरला असंही पृथ्वीबाबांनी म्हटलं आहे.

आणखी वाचा- करोनाचा नवीन स्ट्रेन, सौदी अरेबियाचा आंतरराष्ट्रीय विमान सेवा बंद करण्याचा निर्णय

पृथ्वीराज चव्हाण यांना पंतप्रधान कार्यालयाचाही अनुभव आहे. त्यामुळे त्या अनुषंगाने त्यांना विचारलेल्या प्रश्नावर ते म्हणाले की ज्यावेळी अशी एखादी परिस्थिती निर्माण होते तेव्हा भारतीयांचं आरोग्य, जीव हे धोक्यात न घालण्यासाठी जे काही उपाय असतात ते तातडीने योजायचे असतात. भारतातील जनतेच्या आरोग्याशी तडजोड करणं योग्य ठरणार नाही असाही सल्ला चव्हाण यांनी पंतप्रधान मोदींना दिला आहे.