युक्रेनमधील मारियोपोल या बंदराच्या शहरावर जोरदार मारा करणाऱ्या रशियन फौजांनी, मुलांसह ८० जणांनी आश्रय घेतलेल्या मशिदीवर तोफगोळय़ांचा मारा केल्याचे युक्रेन सरकारने शनिवारी सांगितले. दरम्यान, राजधानी कीव्हच्या सीमेवरही युद्ध भडकले आहे.
मशिदीवर करण्यात आलेल्या माऱ्याने किती हानी झाली याबद्दल लगेचच काही सांगण्यात आलेले नाही. रशिया करत असलेल्या युद्धाची मोठी झळ मारियोपोल शहराला बसली असून तोफांच्या अखंड भडिमारामुळे अडकून पडलेल्या नागरिकांसाठी अन्न व पाणी आणण्याचे प्रयत्न अयशस्वी ठरत आहेत.
सुलतान सुलेमान यांच्या या मशिदीत आश्रयासाठी आलेल्या ३४ मुलांसह तुर्कस्तानचे ८६ नागरिक आहेत, असे तुर्कस्तानमधील युक्रेनी दूतावासाने सांगितले.
राजधानी कीव्ह क्षेत्राभोवती हवाई हल्ल्यांचे भोंगे वाजत होते आणि तोफगोळय़ांच्या माऱ्यामुळे नागरिक आश्रयासाठी सैरावैरा पळत होते. कीव्हभोवती अनेक ठिकाणी युद्धाचा भडका उडाला आहे.
कीव्हच्या वायव्य सीमांनाही तोफगोळय़ांचा भडिमार सहन करावा लागला. वासलक्यिव्ह शहरातील एका दारूगोळय़ाच्या कोठारावर हल्ला करण्यात आल्यानंतर तेथे एक काळा व एक पांढरा असे धुराचे दोन लोट उठले. कोठारावरील हल्ल्यामुळे, स्फोट झालेल्या दारूगोळय़ातून शेकडो लहानलहान स्फोट होत राहिले.
१२ दिवसांच्या हल्ल्यांमध्ये शुक्रवापर्यंत मारियोपोल शहरातील मृत्यूसंख्या १५०० वर गेली असल्याचे महापौर कार्यालयाने सांगितले. सुमारे साडेचार लाख लोकसंख्येच्या या शहरातील एका प्रसूतिगृहावर या आठवडय़ात करण्यात आलेल्या हल्ल्यात ३ जण ठार झाल्यानंतर जगभरात संताप व्यक्त करण्यात आला.
सध्या सुरू असलेल्या बॉम्बफेकीमुळे सामुदायिक थडग्यांसाठी खड्डे खोदण्याचे काम थांबवणे भाग पडले असून, त्यामुळे मृतांचे दफनही थांबले आहे, असे महापौरांनी सांगितले.
२४ फेब्रुवारीला युक्रेनवर आक्रमण केल्यापासून रशियन फौजांनी किमान १२ रुग्णालये व आरोग्य केंद्रे यांना लक्ष्य बनवले असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे. तोफगोळय़ांच्या जोरदार माऱ्यामुळे मारियोपोलपासून ४८९ किलोमीटरवर असलेल्या मायकोलैव शहरातील एक कर्करोग रुग्णालय व अनेक निवासी इमारतींचे नुकसान झाले, अशी माहिती युक्रेन अधिकाऱ्यांनी शनिवारी दिली.
इटलीकडून रशियन नौका जप्त
एपी, मिलान : युक्रेनविरुद्ध सुरू केलेले युद्ध थांबवण्यासाठी रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांच्यावर दबाव टाकण्याच्या उद्देशाने श्रीमंत व्यक्तींच्या मालमत्ता जप्त करण्याचा भाग म्हणून इटलीच्या वित्तीय पोलिसांनी त्रिस्ते बंदरावर रशियन नागरिकाच्या मालकीची ५७८ दशलक्ष अमेरिकी डॉलर किमतीची शिडाची नौका जप्त केली. शुक्रवारी सायंकाळी जप्त करण्यात आलेली ‘साय ए’ ही नौका खते उत्पादन व औष्णिक वीज यांतून
पैसा मिळवलेले अब्जाधीश आंद्रे इगोरेविच मेल्निचेन्को यांच्या मालकीची असल्याचे इटालियन पोलिसांनी सांगितले.
दिव्यांचे झोत टाकणाऱ्या मोटारींतून पोलीस या नौकेच्या दिशेने येत असून अधिकारी नौकेत चढत आहेत, असे व्हिडीओंमध्ये दिसून आले.
सार्दिनियासारखी निसर्गरम्य निर्जन स्थळे, लिगुरियन किनारा व लेक कोमो येथील रशियन अब्जाधीशांच्या मालकीच्या आलिशान नौका आणि बंगले यांतून इटालियन अधिकाऱ्यांनी गेल्या आठवडय़ात सुमारे १५६ दशलक्ष अमेरिकी डॉलर जप्त केले होते.
