संयुक्त राष्ट्रांमध्ये भारताने धार्मिक द्वेषाबाबत दुटप्पीपणा न स्वीकारण्याचे आवाहन केले आहे. संयुक्त राष्ट्रातील भारताचे स्थायी प्रतिनिधी टीएस तिरुमूर्ती म्हणाले की, धार्मिक द्वेषाबाबत दुहेरी मापदंड असू शकत नाहीत. भारत सीमापार दहशतवादाचा सर्वात मोठा बळी ठरला आहे. लोकशाहीच्या तत्त्वांना चालना देऊन दहशतवादाचा सामना करण्यासाठी खऱ्या अर्थाने योगदान देणारी शिक्षण प्रणाली विकसित करण्याचे आवाहन टीएस तिरुमूर्ती यांनी देशांना केले.

भारताने केवळ अब्राहमिक धर्मांविरुद्धच नव्हे तर शीख, बौद्ध आणि हिंदू धर्मासह सर्व धर्मांविरुद्ध द्वेष आणि हिंसाचाराचा मुकाबला करण्यासाठी आंतरराष्ट्रीय समुदायाकडून एकत्रित प्रयत्न करण्याचे आवाहन केले आहे.

द्वेषयुक्त भाषणाचा सामना करण्यासाठी आंतरराष्ट्रीय दिनाच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात तिरुमूर्ती बोलत होते. “आम्ही वारंवार यावर भर दिला आहे की केवळ एक किंवा दोन धर्मांचा समावेश करून धार्मिक द्वेषाच्या भावनेविरुद्ध कारवाई निवडक नसावी. हे निकष अब्राहमिक नसलेल्या धर्मांनाही तितकेच लागू झाले पाहिजेत. असे केले नाही तर असे आंतरराष्ट्रीय दिवस कधीच आपले उद्दिष्ट साध्य करू शकणार नाहीत. धार्मिक द्वेषाच्या भावनेवर दुहेरी मापदंड असू शकत नाहीत,” असे तिरुमूर्ती म्हणाले.

भारतातील बहुसांस्कृतिकता शतकानुशतके जुनी – तिरुमूर्ती

तिरुमूर्ती यांनी संयुक्त राष्ट्रांमध्ये अनेक प्रसंगांबाबत भाष्य केले. गुरुद्वारा, मठ आणि मंदिरे यांसारख्या धार्मिक स्थळांवरील हल्ल्यांमध्ये किंवा अनेक देशांमध्ये अब्राहमिक धर्मांविरुद्ध द्वेष आणि अपप्रचाराच्या वाढीमध्ये धार्मिक द्वेषाच्या भावनेचे अन्य प्रकार दिसून येतात, असे ते म्हणाले. “भारताच्या बहुसांस्कृतिक वैशिष्ट्यामुळे शतकानुशतके इथे आश्रय घेणार्‍या सर्व लोकांसाठी ते सुरक्षित आश्रयस्थान बनले आहे, मग तो ज्यू समुदाय असो वा पारशी किंवा तिबेटी असो. कट्टरतावाद आणि दहशतवादाला तोंड देणारी ही आपल्या देशाची अंगभूत ताकद आहे,” असेही तिरुमूर्ती म्हणाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, अफगाणिस्तानातील काबूलच्या बाग-ए-बाला भागातील गुरुद्वारा कर्ता परवान येथे शनिवारी झालेल्या बॉम्बस्फोटात एका शीख व्यक्तीसह दोन जण ठार तर सात जण जखमी झाले. परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी काबुलच्या बाग-ए-बाला भागातील गुरुद्वारा कर्ता परवान येथे झालेल्या स्फोटाचा निषेध केला. गुरुद्वारा कर्ता पर्वानवरील भ्याड हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध केला पाहिजे, असे त्यांनी म्हटले.