कॅप्टन अमरिंदर सिंग भाजपात प्रवेश करणार?; दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांची घेतली भेट

गेल्या काही दिवसात पंजाबमधील राजकीय वातावरण ढवळून निघाल्यानंतर अमरिंदर सिंग अमित शाह यांच्या भेटीला गेल्याने राजकीय चर्चांना उधाण आहे.

Shah-Amarinder
कॅप्टन अमरिंदर सिंग भाजपात प्रवेश करणार?; दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांची घेतली भेट (File Photo: Twitter/@PunjabGovtIndia)

पंजाबचे माजी मुख्यमंत्री अमरिंदर सिंग केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची दिल्लीच्या निवासस्थानी भेट घेतली. गेल्या काही दिवसात पंजाबमधील राजकीय वातावरण ढवळून निघाल्यानंतर अमरिंदर सिंग अमित शाह यांच्या भेटीला गेल्याने राजकीय चर्चांना उधाण आहे. कॅप्टन अमरिंदर सिंग भाजपात प्रवेश करणार असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरु आहे. मात्र याबाबत अद्याप अधिकृत माहिती नाही. या महिन्याच्या सुरुवातीला कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर काँग्रेस पक्षश्रेष्ठींवर नाराज असल्याचं सांगण्यात येत आहे. राजीनामा दिल्यानंतर काँग्रेस पक्षात काम करणार असल्याचं सांगितलं होतं. मात्र भविष्यातील रणनितीबाबत कोणतंही भाष्य केलं नव्हतं. गेल्या अनेक दशकांपासून गांधी घरण्याशी एकनिष्ट आणि विश्वासू असलेले अमरिंदर सिंग यांनी बंड केल्यास काँग्रेसला मोठा हादरा बसण्याची शक्यता आहे. अमित शाह आणि कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्यात जवळपास ४५ मिनिटं चर्चा झाली.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशी चर्चा केल्यानंतर माजी मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी ट्वीट करून शेतकरी आंदोलनावर चर्चा झाल्याचं सांगितलं. “केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशी चर्चा केली. कृषि कायद्यांविरोधात सुरु असलेल्या आंदोलनावर चर्चा झाली. पीक विविधीकरणात पंजाबला पाठिंबा देण्याव्यतिरिक्त कृषि कायदे रद्द करावे आणि एमएसपी हमीसह संकट त्वरित सोडवण्याची विनंती केली”, असं ट्वीट त्यांनी केलं आहे.

पंजाब विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून भाजपा कॅप्टन अमरिंदर सिंग यांना केंद्रीय कृषिमंत्रिपद देण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कृषि कायद्यांचा होणारा विरोध शमवण्याची त्यांच्यावर जबाबदारी देण्याची शक्यता आहे. दुसरीकडे पंजाबमध्ये कॅप्टन अमरिंदर सिंग भाजपाचे चेहरा असतील, असंही सांगण्यात आहे. त्याचबरोबर ते स्वत:चा पक्ष काढतील असंही बोललं जात आहे.

पंजाब राज्य १९६६ मध्ये अस्तित्वात आलं. १९९७ पूर्वी ज्ञान जैल सिंग यांनीच १९७२ -७५ या कालावधीत मुख्यमंत्रिपदाचा कार्यकाळ पूर्ण केला. १९९७ ते २०१७ पर्यंत प्रकाश सिंग बादल यांनी पंजाबच्या मुख्यमंत्रिपदासाठी तीन कार्यकाळ पूर्ण केले. कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी २००२ ते २००७ या कालावधीत मुख्यमंत्रिपदाचा कार्यकाळ पूर्ण केला. मुख्यमंत्रिपदाचा कार्यकाळ पूर्ण करणारे कॅप्टन अमरिंदर सिंग दुसरे काँग्रेसी नेते आहेत. १९६६ साली पंजाब राज्याची निर्मिती झाल्यानंतर राज्यात दोन विधानसभा क्षेत्रातून निवडून येणारे एकमेव काँग्रेसचे मुख्यमंत्री आहेत. सध्या पंजाबच्या मुख्यमंत्रिपदासाठी ६ महिन्यांचा कालावधी उरला होता. पंजाबमध्ये पुढच्या वर्षी फेब्रवारीमध्ये निवडणुका होणार आहे. मात्र नवज्योत सिंग सिद्धू यांच्यासोबत झालेल्या वादानंतर त्यांनी कालावधी पूर्ण होण्याआधी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला.

गेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसनं ११७ पैकी ७७ जागांवर विजय मिळवला होता. त्यानंतर पुन्हा एकदा कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या गळ्यात मुख्यमंत्रिपदाची माळ पडली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Captain amarinder singh meet union home minister amit shah in new delhi rmt

Next Story
खोबऱ्याच्या तेलाचा वापर टूथपेस्टमध्ये करणे शक्य
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी