झारखंडच्या रामगढ जिल्ह्यात बुधवारी बुधवारी एक भीषण अपघात झाला. मुरबंदा लारीजवळ बस आणि कारची समोरासमोर धडक झाली. त्यानंतर कारला आग लागल्याने पाच जणांचा मृत्यू झाला, अशी माहिती पोलिसांनी दिली. अपघात इतका भीषण होता की बस कारच्या वर चढली होती. त्यामुळे कदाचित कारची फ्यूल टँक फुटल्यामुळे आग लागली असावी, अशी शक्यता पोलिसांनी वर्तवली.

रामगढचे एसपी प्रभात कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, रामगढ जिल्ह्यातील राजराप्पा पोलीस स्टेशन परिसरात सकाळी ८ वाजताच्या सुमारास एक वॅगन आर कार आणि समोरून येणाऱ्या बसचा अपघात झाला. धडक दिल्यानंतर काही वेळातच कारला आग लागली आणि त्यात पाच जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये एक मुलगा आणि दोन महिलांचा समावेश आहे.  या घटनेत बसचा चालकही गंभीर जखमी झाला असून त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.

अपघातात ठार झालेल्यांचे मृतदेह इतके जळाले होते की त्यांची ओळख पटवणे देखील कठीण झाले होते. सर्व मृतदेह पोस्टमार्टमसाठी रुग्णालयात पाठवण्यात आले असून त्यांच्या कुटुंबीयांशी संपर्क साधण्याचे पोलिसांचे प्रयत्न सुरू आहेत. वॅगन आर कार पूर्णपणे जळाल्यामुळे, वाहनाचा नोंदणी क्रमांक वगळता इतर तपशील मिळू शकला नाही. ही गाडी पाटणा येथील आलोक रोशनच्या नावाने नोंदणीकृत आहे. तसेच मृतांची ओळख आणि इतर कारवाईसाठी पाटणा पोलिसांशी संपर्क साधण्यात आला आहे, असं पोलिसांनी सांगितलं.