गोव्यातील बेतुलजवळ एमव्ही मार्स्क फ्रँकफर्ट या मालवाहू जहाजाला शुक्रवारी दुपारी भीषण आग लागली. नौवहन मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार या आगीत एकाचा मृत्यू झाला आहे. मृत व्यक्ती हा फिलीपीन्सचा नागरिक होता. तर या जहाजात फिलिपिनो, मॉन्टेनेग्रिन आणि युक्रेनियन नागरिकांसह २१  क्रू-सदस्य होते. ते मुंद्रा बंदरातून कोलंबो, श्रीलंकेकडे जात होते.

तटरक्षक दलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, शॉर्ट सर्किटमुळे जहाजाला आग  लागली आणि पसरली. कर्मचारी आग विझवण्यात अयशस्वी ठरले; त्यांना आधीच सतर्कतेचा इशारा देण्यात आला होता.

अधिक वाचा: भर खवळलेल्या समुद्रात भारतीय नौदलाने ८ भारतीयांचे प्राण वाचवले!

हे जहाज सागरी धोकादायक (IMDG) माल घेऊन जात असल्याची माहिती मिळाली. हा माल समोरच्या भागात होता आणि तिथूनच स्फोट ऐकू येत होते. गोव्याजवळ कारवार येथे तळ असलेल्या भारतीय नौदलाने या जहाजाला सतर्कतेचा इशारा दिला होता.

सुरुवातीला, जहाजाच्या कर्मचाऱ्यांनी स्वतःहून आग विझवण्याचा प्रयत्न केला पण त्यांना ती आटोक्यात आणता आली नाही. आग डेकवर वेगाने पसरली, त्यामुळे कंटेनर फुटले. प्राथमिक माहितीनुसार, जहाजावरील १६०  पैकी २०  कंटेनरला आग लागली आहे. मालवाहू जहाज भारतीय किनाऱ्यापासून सुमारे ८० नॉटिकल मैलांवर आहे, असे शिपिंग मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

गोव्याच्या तटरक्षक दलाचे उपमहानिरीक्षक मनोज भाटिया यांनी सांगितले की, त्यांनी अग्निशमन उपकरणांसह तीन जहाजे घटनास्थळी पाठवली आहेत. त्यांनी असेही सांगितले की, त्यांनी कोची तळाला मदतीसाठी हेलिकॉप्टर पाठवण्यास सांगितले आहे.

अधिक वाचा: पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांच्या उंचीची खिल्ली उडवल्याबद्दल इटलीच्या पत्रकाराला तब्बल ४. ५ लाखांचा दंड!

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

भारतीय नौदलाच्या वेस्टर्न नेव्हल कमांडचे ‘मेरीटाइम ऑपरेशन सेंटर (MOC) आणि इन्फॉर्मेशन फ्यूजन सेंटर – इंडियन ओशन रीजन (IFC-IOR)’ यांनाही परिस्थितीची माहिती देण्यात आली. भारतीय नौदलाने अतिरिक्त सहाय्य आवश्यक आहे का याचे आकलन करण्यासाठी तटरक्षक दलाशी समन्वय साधला आहे.

भारतीय तटरक्षक दलाने आवश्यक ती मदत पुरवली आहे. शिवाय एक डॉर्नियर विमान देखील पाठवले आहे आणि मदतीसाठी मुंबई बंदरातून इमर्जन्सी टोइंग व्हेसेल (ईटीव्ही) देखील पाठवण्यात आले आहे. ICG नुसार, डेकवर अजूनही स्फोट होत आहेत.