Senthil Balaji’s Cash For Jobs Case in Supreme Court : तमिळनाडू सरकारने माजी मंत्री व्ही. सेंथिल बालाजी यांच्याशी संबंथित एका खटल्याप्रकरणी दोन हजारांहून अधिक लोकांना कथित ‘कॅश फॉर जॉब’ घोटाळ्यात (नोकरीच्या बदल्यात पैसे) आरोपी बनवून त्यांच्यावर खटला दाखल करण्याची मागणी केली होती. तमिळनाडू सरकारच्या याचिकेवर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने नाराजी व्यक्त केली. इतक्या लोकांचं नाव या प्रकरणात समाविष्ट करून सदर खटला लांबवण्याचा प्रयत्न होत असल्याचं न्यायालयाने नमूद केलं.

न्यायमूर्ती सूर्य कांत व न्यायमूर्ती जॉयमाला बागची यांच्या बेंचने तमिळनाडू सरकारच्या याचिकेवर म्हटलं आहे की हा न्यायव्यवस्थेची थट्टा करण्याचा प्रकार आहे. यातून न्यायपालिकेच्या डोळ्यात धूळफेक करण्याचा प्रयत्न होत आहे. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने सेंथिल बालाजी यांच्याशी संबंधित सर्व प्रलंबित खटल्यांची यादी करण्याचे आदेश दिले आणि या सदर प्रकरणाची सुनावणी बुधवारपर्यंत तहकूब करण्यात आली आहे.

न्यायमूर्ती काय म्हणाले?

न्यायमूर्ती कांत म्हणाले, सदर घोटाळ्यात मंत्र्यांव्यतिरिक्त कथित मध्यस्थ किंवा दलाल कोण होते? मंत्र्यांच्या शिफारशींवर काम करणारे अधिकारी कोण होते? निवड समितीचे सदस्य कोण होते? नियुक्ती देणारे अधिकारी कोण होते? ते आम्हाला जाणून घ्यायचं आहे.

आयुष्यभर हा खटला संपणार नाही : न्यायमूर्ती सूर्य कांत

बेंचने या प्रकरणावर सुनावणी करताना म्हटलं आहे की “तमिळनाडू सरकारचा कारभार संशयास्पद आहे. मंत्री बालाजी यांच्या आयुष्यभर हा खटला चालूच राहील. शेवटपर्यंत हा खटला संपणारच नाही, अशी तजवीज सरकार करत असल्याचं जाणवतंय. ज्या गरीब लोकांकडून मंत्री किंवा त्यांच्या गुंडांनी जबरदस्तीने अथवा अमिष दाखवून पैसे घेतले त्यांच्यावर लक्ष ठेवून आता त्यांनाच या प्रकरणात आरोपी बनवून अडकवलं जातंय.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दोन प्रकरणांमध्ये दोन हजार आरोपींची यादी पाहून न्यायालयाचा संताप

न्यायमूर्ती सूर्य कांत म्हणाले, “तुमच्या मंत्र्याने, त्यांच्या दलालाने अथवा गुंडांनी गरिबांकडून पाच हजार, १० हजार, २० हजार, एक लाख, दोन लाख रुपये घेतले, अशा लोकांवर लक्ष ठेवून तुम्ही त्यांची यादी करून त्यांच्यावर खटला भरताय का? जेणेकरून त्या मंत्र्यांच्या संपूर्ण आयुष्यात या खटल्याचा निकाल लागू शकणार नाही. हाच तुमचा हेतू आहे का? असं करून तुम्ही न्यायव्यवस्थेची फसवणूक करत आहात. तथाकथित लाच देणाऱ्यांना, आपल्या मुलांना नोकरी मिळावी यासाठी पैसे देणाऱ्यांना आता तुम्ही आरोपी बनवू पाहताय? दोन प्रकरणांमध्ये तब्बल २,००० आरोपींची नावं तुम्ही दाखल केली आहेत.”