Cat Kumar seeks residential certificate in bihar : बिहारमध्ये कधी काही घडेल याचा नेम नाही, आपण विचारही करू शकणार नाही. गेल्या काही दिवसांपासून वेगवेगळ्या घटना उजेडात येत आहेत. आता येथे रहिवासी प्रमाणपत्रासाठी चक्क एका मांजराने अर्ज केल्याचा प्रकार समोर आला आहे. बिहारमधील रोहतास येथे ‘कॅटी बॉस’ आणि कॅटिया देवी यांचा मुलगा ‘कॅट कुमार’ याच्या रहिवासी प्रमाणपत्रासाठी ऑनलाइन अर्ज दाखल करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे.

विशेष म्हणजे या अर्जामध्ये फोन नंबर आणि इमेल आयडी अशी माहिती देखील भरण्यात आली आहे. इतकेच नाही तर हा अर्ज सुरूवातीच्या टप्प्यातच बाद न होता तो पुढे देखील पाठवण्यात आला आहे.

देण्यात आलेल्या तक्रारीनुसार, २९-०७-२०२५ रोजी मोबाइल क्रमांक ६२०५६३१७९९ यावरून कॅट कुमार नावाने रहिवासी प्रमाणपत्र जारी करण्यासाठी अर्ज मिळाला, ज्यामध्ये वडीलांचे नाव कॅटी बॉस आणि आईचे नाव कटिया देवी असे होते. दिलेला पत्ता होता हा गाव – अतिमिगंज, वॉर्ड क्रमांक ०७, पोस्ट – महादेवा, पोलिस स्टेशन – नसरीगंज, पिन – ८२१३१०. अर्जदाराच्या छायाचित्र म्हणून एका मांजराचा फोटो अपलोड करण्यात आला होता. तर या अर्जाबरोबर दिलेला ईमेलashutoshkumarsoni54321@gmail.com असा होता.

हा प्रकार उजेडात आल्यानंतर जिल्हा दंडाधिकारी उदित सिंह यांनी अधिकाऱ्यांना कारवाईचे आदेश दिले आहेत, तसेच एका अनोळखी व्यक्तीविरोधात नरसिंगगंज पोलिस ठाण्यात १० ऑगस्ट २०२५ रोजी तक्रार देखील दाखल करण्यात आली आहे.

दरम्यान तक्रारीत अधिकाऱ्याने म्हटले आहे की हा अर्ज खोट्या माहितीच्या आधारे करण्यात आला होता आणि त्याचा उद्देश सरकारी कार्यपद्धतींची खिल्ली उडवणे होता. या प्रकरणाचा आता पोलिसांकडून तपास सुरू आहे.

“अर्जदाराचे नाव याबरोबरच देण्यात आलेले वडील आणि आईचे नाव हे चुकीचे होते आणि ते टिंगल करण्यासाठी देण्यात आले होते. अशा कृती सरकारी कामात अडथळा आणणाऱ्या आहेत. या व्यक्तीने ऑनलाईन प्लॅटफॉर्मचा गैरवापर करत, सरकारू यंत्रणेच्या कार्यपद्धतीचा खोटी माहिती आणि मांजराचा फोटो सादर करून उपहास करण्याता प्रयत्न केला आहे,” असे तक्रारीत म्हटले आहे.

पोलिसांनी तक्रारीची दखल घेतली आहे आणि असा अर्ज कसा स्वीकारला गेला आणि त्यामागे कोण होते याची चौकशी करण्यासाठी एका अधिकारी नियुक्त करण्यात आला आहे.