देशातील सर्वात मोठ्या बँक फसवणूक प्रकरणात सीबीआयने एबीजी शिपयार्ड लिमिटेड आणि तिचे तत्कालीन अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक ऋषी कमलेश अग्रवाल यांच्यासह इतरांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. एबीजी शिपयार्ड जहाज बांधणी आणि जहाज देखभाल क्षेत्रातील आघाडीची कंपनी समजली जाते.
स्टेट बँक ऑफ इंडियाच्या नेतृत्वाखालील बँकांच्या संघाकडून २२ हजार ८४२ कोटी रुपयांच्या कथित फसवणुकीच्या संदर्भात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे, असे अधिकाऱ्यांनी शनिवारी सांगितले.
अग्रवाल व्यतिरिक्त, सीबीआयने तत्कालीन कार्यकारी संचालक संथानम मुथास्वामी, संचालक – अश्विनी कुमार, सुशील कुमार अग्रवाल, रवी विमल नेवेतिया आणि आणखी एक कंपनी एबीजी इंटरनॅशनल प्रायव्हेट लिमिटेड यांच्यावरही गुन्हेगारी कट, फसवणूक, विश्वासघात आणि अधिकारांचा दुरुपयोग यासारख्या गुन्ह्यांसाठी खटला दाखल केला आहे. या सर्वांवर भारतीय दंड संहिता आणि भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये कारवाई करण्यात आली असल्याचे सांगण्यात आले आहे.
बँकेच्या कन्सोर्टियमने प्रथम ८ नोव्हेंबर २०१९ रोजी तक्रार दाखल केली होती, ज्यावर सीबीआयने १२ मार्च २०२० रोजी काही स्पष्टीकरण मागितले होते. बँकांच्या कन्सोर्टियमने त्याच वर्षी ऑगस्टमध्ये नवीन तक्रार दाखल केली आणि दीड वर्षांपेक्षा जास्त तपासानंतर सीबीआयने त्यावर कारवाई केली.
एसबीआय तसेच २८ बँका आणि वित्तीय संस्थांनी कंपनीला २ हजार ४६८ .५१ कोटी रुपयांचे कर्ज मंजूर केले होते, असे अधिकाऱ्याने सांगितले. तसेच त्यांनी हे देखील सांगितले की फॉरेन्सिक ऑडिटमध्ये हे उघड झाले आहे की २०१२-१७ दरम्यान, आरोपींनी कथितरित्या निधीचा गैरवापर आणि बेकायदेशीर कृत्ये केली आहेत. सीबीआयने नोंदवलेला हा आतापर्यंतचा सर्वात मोठा बँक फसवणूकीचा गुन्हा आहे.