कोळसा परवाना वाटप प्रकरणी खासदार विजय दर्डा व त्यांचा मुलगा तसेच इतरांवर आरोप निश्चित करण्याप्रकरणी त्यांचे म्हणणे ऐकून घेण्यासाठी सीबीआयचे विशेष न्यायालय २६ सप्टेंबरला पुढील सुनावणी घेणार आहे. या प्रकरणी पुरवणी अंतिम अहवाल २२ सप्टेंबपर्यंत सादर केला जाईल अशी माहिती सीबीआयने दिली. त्यानंतर आरोप निश्चित करण्याबाबत युक्तीवाद सुरु करता येईल असे विशेष सरकारी वकील आर.एस.चीमा यांनी सांगितले. विशेष न्यायालयात याची सुनावणी सुरु असून, सीबीआयने आरोपपत्रात विजय दर्डा त्यांचा मुलगा देवेंद्र, नागपूर येथील एएमआर आर्यन अँड स्टील प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक मनोज जैस्वाल तसेच त्यांची कंपनीवर ठपका ठेवला आहे. या पूर्वी न्यायालयाने तिघांना जामीन मंजूर केला होता.  बेकायदेशीरपणे कोळसा खाणीचा परवाना मिळवल्याचा आरोप सीबीआयने २७ मार्च रोजी दाखल केलेल्या आरोपपत्रात केला होता. दर्डा यांनी आपल्यावरील आरोपांचा इन्कार केला आहे. एमआर आर्यन अँड स्टील पायव्हेट लिमिटेडने त्यांना यापूर्वी पाच खाणींचे वितरण करण्यात आल्याचे अर्जात जाणीवपूर्वक लपवल्याचे सीबीआयने एफआयआरमध्ये नमूद केले होते.